सिडको क्षेत्रात सीसीटीव्हीचा वॉच
By admin | Published: August 21, 2015 12:01 AM2015-08-21T00:01:16+5:302015-08-21T00:01:16+5:30
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच वाढत्या गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसविण्याचा निर्णय घेतला आहे
नवी मुंबई : शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच वाढत्या गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विविध नोड्समधील २९३ ठिकाणांवर एकूण ५७४ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे १०८ कोटी ६५ लाख रुपयांचे कंत्राट मे. विप्रो लि. कंपनीला देण्यात आले आहे. पुढील १० महिन्यांत कॅमेरे बसविण्याचे हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
सिडको कार्यक्षेत्रातील नोड्सचा झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. वाहतुकीचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गुन्हे करून गुन्हेगार मागे कोणताही पुरावा ठेवत नसल्याने गुन्ह्याची उकल करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पर्याय उत्तम ठरत आहे. नवी मुंबई महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याच धर्तीवर सिडकोने आपल्या कार्यक्षेत्रात अशी यंत्रणा कार्यान्वित करावी, असा प्रस्ताव तत्कालीन पोलीस आयुक्त ए. के. शर्मा यांनी सिडकोला दिला होता. त्यानुसार सिडकोने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सप्टेंबर १४ मध्ये जागतिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याला एल अॅण्ड टी, विप्रो आणि हिमाचल फ्युटीरिस्ट कम्युनिकेशन या तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यापैकी विप्रो लि. या कंपनीला सीसीटीव्ही बसविण्याचे १०८ कोटी ६५ लाखांचा ठेका देण्यात आला. १० महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे बंधन संबंधित कंपनीवर घालण्यात आले आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षे या संपूर्ण यंत्रणेची देखभाल करण्याची जबाबदारी सुध्दा या कंपनीचीच असणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचा आराखडा तयार करण्यासाठी सिडकोने पीडब्लूएचसी या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. या कंपनीने पोलिसांशी समन्वय साधून कळंबोली, खारघर, खांदेश्वर,पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, उलवे, द्रोणागिरी, उरण, न्हावा-शेवा आणि तळोजा या क्षेत्रातील २९३ प्रमुख ठिकाणांची निवड केली आहे. सल्लागार कंपनीने या ठिकाणांवर ५७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जवळपास ७० गावांची प्रवेशद्वारे सुध्दा या कॅमेरेच्यांच टप्प्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)