मुंबई : दोन वर्षापूर्वी गोवंडी येथील शाळेत एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली होती़ मात्र अद्यापही शाळेचा परिसर सुरक्षित करण्यासाठी पालिकेने कोणतीच पावले उचललेली नाहीत़ त्यामुळे शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची जोरदार मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत आज केली़
समाजवादीच्या नगरसेविका नूरजहाँ रफिक यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे याकडे लक्ष वेधल़े गोवंडी येथील स्थानिक नगरसेविका असल्याने त्यांनी हा मुद्दा शिक्षण समितीत आज उपस्थित केला़ पालिका शाळांमधील सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरत असल्याने समाजकंटक, गदरुल्ले, यांचा राजरोस वावर सुरू असतो, अशी तक्रार अजंठा यादव, प्रमोद मोरजकर, प्रकाश दरेकर यांनी केली़ (प्रतिनिधी)
सीसीटीव्हीचा खर्च न परवडणारा?
पालिकेच्या 1127 शाळा आहेत़ सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणो परवडणारे नाही़ त्यामुळे नगरसेवक निधीतून ही सोय करता येईल का, याची चाचपणी करण्याची सूचना शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी केली़ याबाबत पुढच्या बैठकीत प्रशासनामार्फत अहवाल सादर करण्यात येणार आह़े