एसटी स्थानकांवर सीसीटीव्हींचा ‘वॉच’
By admin | Published: January 25, 2016 01:43 AM2016-01-25T01:43:30+5:302016-01-25T01:43:30+5:30
एसटी स्थानक आणि आगारांत सीसीटीव्ही बसविण्याची चर्चा गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. अखेर या प्रस्तावाला एसटी महामंडळाकडून पुढे सरकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : एसटी स्थानक आणि आगारांत सीसीटीव्ही बसविण्याची चर्चा गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. अखेर या प्रस्तावाला एसटी महामंडळाकडून पुढे सरकविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश एसटी स्थानक आणि आगारांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
महिलांची सुरक्षा, कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख, तसेच संशयास्पद व्यक्ती आणि सामानावर लक्ष ठेवण्यासाठी एसटीत सध्या सुरक्षा यंत्रणाच कार्यरत नाही. जानेवारी २0१२ मध्ये एसटीच्या संतोष माने याने स्वारगेटमधून बस पळवून रस्त्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि यात ९ जण ठार, तर २७ प्रवासी जखमी झाले. त्यानंतर मे २०१२ मध्ये अंबाजोगाई-कुर्ला एसटी बसमध्ये एका पार्सलचा ब्लास्ट होऊन वाहकासह त्याची आई, पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले होते. या दोन मोठ्या घटनानंतर बस स्थानके आणि आगारात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय एसटीकडून घेण्यात आला. त्यानुसार महत्त्वाच्या ४0 बसस्थानक आणि आगारात सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात आले. यात मुंबईतील महत्त्वाच्या असलेल्या मुंबई सेंट्रल, परेल, कुर्लाबरोबरच पुण्यातील स्वारगेट, औरंगाबाद, रत्नागिरीतील स्थानक, आगारांचा समावेश होता. आता मात्र, एसटीकडून राज्यातील बहुतांश स्थानक व आगारात सीसीटिव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लवकरच अहवाल प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू केले जाईल.