चोरट्यांवर सीसीटीव्हींचा वॉच!
By admin | Published: July 20, 2014 10:57 PM2014-07-20T22:57:00+5:302014-07-20T22:57:00+5:30
येथील परिमंडळ २ मधील सोनसाखळी चोऱ्यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त संजयसिंग ऐनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली आहे
विवेक पाटील, पनवेल
येथील परिमंडळ २ मधील सोनसाखळी चोऱ्यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त संजयसिंग ऐनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यानुसार सोनसाखळी चोरीसारख्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी खासगी कंपनीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे चोर पकडण्यास मदत होईल. त्याचबरोबर संबंधीत आरोपीविरोधात पुरावा जमा करण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबई आयुक्तालयात नवी मुंबई महापालिका हद्द तसेच पनवेल व उरण तालुक्यांचा समावेश होतो. पनवेल परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याने या परिसराची लोकसंख्या वाढली आहे. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वे सेवा, एनएमएमटी, बेस्ट, केडीएमटी, एसटी यांसारख्या परिवहनाच्या सुविधा असल्याने दिवसेंदिवस नागरीकरण वाढत चालले आहे. वाढत्या सोनसाखळी चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण अधिक आहे. सोनसाखळी चोर गळ्यातील दागिने किंवा मंगळसूत्र खेचून वेगाने पसार होतात. गेल्या काही दिवसांत पकडणे अतिशय कठीण जाते किंवा पकडले गेल्यास पुरेसे पुरावे गोळा करणे शक्य होत नाही. वाऱ्याच्या वेगाने जाणाऱ्या आरोपीचा चेहरा न दिसल्याने तो ओळखणे फिर्यादीला शक्य होत नाही.
याव्यतिरिक्त सराईत गुन्हेगार तसेच तुरुंगातून सुटून आलेल्या आरोपींवरही लक्ष ठेवण्यात अनंत अडचणी असतात. परिणामी या घटनांवर आळा घालण्यात अपयश येत आहे. पोलीस आयुक्तालयाकडे निधी नसल्याने सीसीटीव्हीसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाही
करता येत नाहीत. यावर उपाय
म्हणून अशा चोऱ्या होण्याच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलीस उपायुक्त
संजयसिंग ऐनपुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी पुढाकार घेऊन कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)