मुंबई : रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या तक्रारदारांना मिळणारी वागणूक, कोठडीत असलेल्या आरोपींच्या हालचाली आता सीसीटीव्हींमध्येही कैद होणार आहेत. मुंबई उपनगरीय मार्गावरील सर्व रेल्वे पोलीस (जीआरपी) स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम दोन दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यामुळे आरोपींचे मृत्यू रोखण्याबरोबरच, फिर्यादींना चांगली वागणूक मिळणे शक्य होणार आहे.मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही असून, त्याचे नियंत्रण हे आरपीएफकडे (रेल्वे सुरक्षा दल) आहे. प्रवाशांच्या हालचाली टिपण्याबरोबरच गुन्ह्यांचा छडा लावण्यास या सीसीटीव्हींची मदत आरपीएफ आणि जीआरपीला मिळते. मात्र, आतापर्यंत रेल्वे पोलीस (जीआरपी) स्टेशनमध्ये सीसीटीव्ही नव्हते. २0१४ मध्ये वडाळा रेल्वे पोलीस स्टेशमध्ये एका आरोपीचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही न्यायालयाने वारंवार आदेश दिल्यानंतर या आदेशाचे पालन करत, अखेर १७ रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय जीआरपीकडून (रेल्वे पोलीस) घेण्यात आला. त्यानुसार, त्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. हे काम दोन दिवसांपूर्वीच पूर्ण करण्यात आल्याची माहिती मधुकर पांडेय (जीआरपी, आयुक्त) यांनी दिली. सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही बसविण्याचे आणि त्याचे मॉनिटरिंग करण्याचे काम आमचे नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अखेर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्व १७ पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आणि ते काम आम्ही पूर्ण केले. सीसीटीव्ही बसविल्यामुळे तक्रार दाखल करणाऱ्या प्रवाशांना मिळणारी वागणूक, पोलिसांच्या हालचाली या कॅमेऱ्यात कैद होतील. त्याचबरोबर, कोठडीमध्ये असलेल्या आरोपींच्या हालचालीही यात टिपता येतील, असे पांडेय म्हणाले. त्यामुळे पोलीस स्थानकावर वचक राहण्याबरोबरच कोठडीमध्ये असलेल्या गुन्हेगारांचे मृत्यूही रोखण्यास मदत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
रेल्वे पोलीस स्टेशनमधील घडामोडींवर ‘सीसीटीव्ही वॉच’
By admin | Published: June 06, 2016 2:57 AM