Join us

दहावीच्या परीक्षा काळातच मिळणार कलचाचणीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 6:34 AM

राज्य शिक्षण मंडळाकडून डिसेंबर-जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या कलचाचणीच्या अहवालांचे वाटप यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरच करण्यात येईल.

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून डिसेंबर-जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या कलचाचणीच्या अहवालांचे वाटप यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवरच करण्यात येईल. दहावीची परीक्षा संपण्याआधी विद्यार्थ्यांना अहवाल मिळणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शाळा स्तरावर राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.मुंबई विभागीय शिक्षण मंडळाकडून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व मान्यताप्रप्त शाळांच्या मुख्याध्यापकांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. दहावीच्या कल अभिक्षमता चाचणी अहवालांचे वाटप १५ मार्च रोजी सर्व वितरण केंद्रांवर विभागीय शिक्षण मंडळाकडून होईल. त्यानंतर, शाळा प्रतिनिधींनी त्या-त्या परीक्षा केंद्रांवर जाऊन, विद्यार्थ्यांची यादी तयार करून या अहवालांचे वाटप विद्यार्थ्यांना करायचे आहे. यासाठी शाळांना १६ मार्च ते २२ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर पेपर झाल्यानंतर शाळा प्रतिनिधींनी या अहवालाचे वाटप करायचे आहे.विद्यार्थ्यांना करिअर निवडणे सोपे जावे, यासाठी त्यांना परीक्षेआधीच किंवा दहावीनंतर काय हे ठरविण्याआधी त्यांचा कल कुठे आहे हे समजणे आवश्यक असल्याने कलचाचणी घेण्यात येते. त्यामुळे अहवालाचे वाटप परीक्षा संपण्याआधी करणार असल्याचे श्यामची आई फाउंडेशनच्या शीतल बापट यांनी सांगितले. शाळांना अहवाल पोहोचण्याआधी तो संबंंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.ही चाचणी विद्यार्थ्यांनी श्यामची आई फाउंडेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभाग, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्या सहकार्याने ही मोबाइल अ‍ॅपद्वारे दिली आहे.