मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर लोखंडी वस्तू, तसेच स्फोटके सापडल्यानंतर, घातपाताची शक्यता रेल्वे पोलिसांकडून वर्तविण्यात आली. त्याची गंभीर दखल घेत, घातपातांना आळा घालण्यासाठी ओव्हरहेड वायरच्या खांबांना (ओएचई मास्ट) सीसीटीव्ही बसवण्यावर विचार केला जात आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी मुंबईतील मुख्यालयात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्या वेळी मध्य व पश्चिम रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), लोहमार्ग पोलीस (जीआरपी) आणि एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ), रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ओव्हरहेड वायरच्या खांबांना सीसीटीव्ही बसवण्यावर चर्चा करण्यात आली. दिवा रेल्वे स्थानकाजवळ एका एक्स्प्रेस ट्रेनच्या लोको पायलटला रुळाचा तुकडा ठेवल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रसंगावधान राखून ट्रेन थांबवण्यात आली व मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर, नवी मुंबईतीलही एका रेल्वे स्थानकाच्या रुळांवर स्फोटके सापडली होती. ही घटना घडलेली असतानाच, मुंबईबाहेरील रेल्वे स्थानकांच्या रुळांवरही लोखंडी तुकडे सापडल्याचे निदर्शनास आले. दिवा घटनेचा तपास तर हा दहशतवादविरोधी पथक, तसेच एनआयएकडून करण्यात आला. एकूणच वारंवार घडणाऱ्या या घटनेची रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांकडून दखल घेण्यात आली. रेल्वे पोलिसांकडून सुरक्षेचे उपाय म्हणून रुळांची गस्त घालण्यासाठी विशेष पथकेही नेमली. सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असतानाच, एक नवीन योजना व शक्कल लढवण्यात आली आहे. रुळांजवळ असणारे ओव्हरेड वायरला जोडलेल्या खांबांना सीसीटीव्ही बसवण्यावर विचार केला जात आहे. या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून घेण्यात आलेल्या बैठकीतच चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. घातपाताची शक्यता किंवा रुळांना धोका निर्माण होऊ शकतो, अशा ठिकाणी असलेल्या ओव्हरहेड वायरच्या खांबांना हे सीसीटीव्ही बसवण्यावर प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)
ओव्हरहेडच्या खांबांना सीसीटीव्ही
By admin | Published: March 09, 2017 3:25 AM