Join us

नगरसेवक निधीतून सीसीटीव्हीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:24 AM

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपापल्या प्रभागात नगरसेवक निधीद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची परवानगी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे मागितली होती.

मुंबई : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपापल्या प्रभागात नगरसेवक निधीद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची परवानगी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे मागितली होती. मात्र, राज्य सरकारमार्फत सीसीटीव्ही बसविण्याचे काम यापूर्वीच सुरू झाल्याने आयुक्त अजय मेहता यांनी ही मागणी फेटाळली. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत यावर प्रशासनाने फेरविचार करण्याचा आग्रह सदस्यांनी धरला.मुंंबईकरांच्या सुरक्षेसाठी नगरसेवक निधीतून मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची परवानगी द्यावी, अशी ठरावाची सूचना सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी मांडली होती. यामुळे मुंबईत वाढलेल्या स्त्रियांच्या छेडछाडीच्या घटना, लुटमारीच्या प्रकारांना आळा बसेल. तसेच सीसीटीव्हीमुळे अनधिकृत फेरीवाले, बेकायदा बांधकामांवरही नियंत्रण राहण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.मात्र राज्य सरकारमार्फत सीसीटीव्ही बसवण्याचे काम मुंबईत सुरू असल्याने ही परवानगी देत येत नसल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा हा अभिप्राय फेटाळत नगरसेवक निधीतून सीसीटीव्ही बसवण्याची परवानगी दिल्यास मुंबईकरांची सुरक्षा आणखी वाढेल, असे मत सर्व सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे बहुमाताने हा प्रस्ताव फेरविचारार्थ प्रशासनाकडे पाठवण्यात आला.