अनैतिक संबंधाच्या संशयातून काढला सीडीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 06:06 AM2018-08-07T06:06:49+5:302018-08-07T06:06:52+5:30
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीडीआर प्रकरण उघडकीस आणल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.
मुंबई : ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सीडीआर प्रकरण उघडकीस आणल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. कारवाईनंतरही हा प्रकार सुरूच असल्याची माहिती मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाच्या कारवाईतून उघड झाली आहे. प्रेयसीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराने तिच्या मोबाइलचा सीडीआर काढला. याच सीडीआरच्या आधारे प्रेयसीच्या मित्राकडून १० लाख उकळले. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर इम्तियाज इक्बाल पोथ्यावाला उर्फ मन्नू याच्यासह ठाणे सीडीआर प्रकरणातील आरोपी शैलेश मांजरेकरला बेड्या ठोकल्या आहेत.
वाळकेश्वरमध्ये ४४ वर्षीय तक्रारदार व्यावसायिक पत्नी आणि मुलांसह राहतात. गेल्या वर्षी त्यांची इम्तियाजच्या प्रेयसीसोबत ओळख झाली. काही दिवसांत त्यांचा इम्तियाजच्या प्रेयसीसोबत संवाद वाढला. प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध जुळल्यामुळे आपल्याला ती टाळाटाळ करीत असल्याचा संशय इम्तियाजला आला. दोघांमध्ये खटके उडू लागले. इम्तियाजही व्यावसायिक आहे.
अखेर त्याने ठाणे सीडीआर प्रकरणातील आरोपी मांजरेकरच्या मदतीने प्रेयसीच्या मोबाइलचा सीडीआर काढला. तिचे व्हॉट्सअॅप संदेशही मिळविले. या आधारे त्याने व्यावसायिकाच्या पत्नीला संदेश पाठविले. व्यावसायिकाचे बाहेर प्रेमसंबंध असल्याबाबत सांगितल्याने व्यावसायिकाचे पत्नीसोबत वाद सुरू झाले. हे थांबविण्यासाठी इम्तियाजने २ कोटी मागितले. व्यावसायिकाने १० लाख रुपये दिले. मात्र त्याच्याकडून पैशांची मागणी वाढू लागली. अखेर त्याने खंडणीविरोधी पथकाकडे शुक्रवारी धाव घेतली. त्यानुसार इम्तियाज व नंतर मांजरेकरलाही अटक केली आहे. दोघांनाही ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय सावंत यांनी सांगितले.