सिलिंग प्लास्टरने घेतला आठ वर्षांच्या आरसलानचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:05 AM2021-07-10T04:05:28+5:302021-07-10T04:05:28+5:30

मुंबई : एमएमआरडीएच्या इमारतीतील खोलीमधील सिलिंगचे प्लास्टर शुक्रवारी पहाटे डोक्यात पडून झोपेत असलेल्या आरसलान अन्सारी (वय ८) या मुलाचा ...

Ceiling plaster killed eight-year-old Arsalan | सिलिंग प्लास्टरने घेतला आठ वर्षांच्या आरसलानचा बळी

सिलिंग प्लास्टरने घेतला आठ वर्षांच्या आरसलानचा बळी

Next

मुंबई : एमएमआरडीएच्या इमारतीतील खोलीमधील सिलिंगचे प्लास्टर शुक्रवारी पहाटे डोक्यात पडून झोपेत असलेल्या आरसलान अन्सारी (वय ८) या मुलाचा जागीच मृत्यू झाला; तर त्याची आई फहमीदा (२९) यादेखील गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना कूपर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

गोरेगाव पश्चिमच्या एमएमआरडीए इमारतीत अमन पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावर आरसलान हा वडील शमीम अब्दुल कय्युम अन्सारी, आई फहमीदा बानो, फहमीदाची आई फरिदाबानो यांच्यासोबत सहा महिन्यांपासून राहत होता. शमीम हे व्यवसायाने वाहनचालक असून मिरगीच्या विकाराने ग्रस्त असलेल्या आईची काळजी घेण्यासाठी भिवंडीत राहतात. कामाच्या निमित्ताने त्यांना ठाण्यावरून ये-जा करावी लागत असल्याने पत्नी व मुलाला भेटण्यासाठी अधूनमधून ते गोरेगावला येत असतात.

शुक्रवारी पहाटे चार वाजता आरसलान हा आई व आजीसोबत घरात झोपला होता, तेव्हाच त्यांच्या खोलीचे प्लास्टर कोसळले. खोलीत अंधार आणि झोपेत बेसावध असल्याने नेमके काय झाले हे पाहण्यासाठी फरिदाबानो यांनी लाईट सुरू केला. तेव्हा फहमीदा यांच्या छातीवर प्लास्टरचे तुकडे पडल्याने त्या रक्तबंबाळ झाल्याचे त्यांना दिसले; तर शेजारीच झोपलेल्या आरसलानच्या डोक्यात रॉड घुसला होता. शेजाऱ्यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनी पोलिसांना कळविले. साडेसहाच्या सुमारास गोरेगाव पोलिसांनी मायलेकाला कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र आरसलानला मृत घोषित करण्यात आले; तर फहमीदा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून मुलाला गमावण्याचा मोठा धक्का अन्सारी कुटुंबाला बसला आहे. शवविच्छेदनानंतर वर्सोवा दफनभूमीत त्याला मूठमाती देण्यात आली.

प्रशासनाचे दुर्लक्ष ठरले जीवघेणे

'या इमारतीत बऱ्याचदा अशा प्रकारे प्लास्टर कोसळण्याचे प्रकार घडले असून वारंवार सोसायटी पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र एमएमआरडीएकडून या प्रकरणी दुर्लक्ष केले गेल्याने आरसलानला जीव गमवावा लागला.

(आतिक खान - स्थानिक)

त्याची प्राणज्योत मालवली होती

नातवाच्या डोक्यात रॉड घुसलेला पाहून माझ्या मावशीने त्याच्या डोक्यातून तो काढला. मात्र त्याने काहीच हालचाल केली नाही. कदाचित त्याचवेळी त्याची प्राणज्योत मालवली होती. एमएमआरडीए प्रशासनाच्या हलगर्जीपणाने त्याचा जीव घेतला.

- आमीर शेख, आरसलानचे मामा

Web Title: Ceiling plaster killed eight-year-old Arsalan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.