31 डिसेंबर यंदा घरातच साजरा करा; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 02:16 AM2020-12-29T02:16:08+5:302020-12-29T07:00:12+5:30
गृह विभागाने सोमवारी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना पाठविल्या आहेत.
मुंबई : कोविड-१९मुळे सध्या देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदा ३१ डिसेंबर आणि नूतन वर्षाचे स्वागत नागरिकांनी घरी थांबूनच अत्यंत साधेपणाने करावे, असे आवाहन गृह विभागाने केले आहे. याबाबत गृह खात्याने मार्गदर्शक सूचन जारी केल्या आहेत.
राज्यात ५ जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी लागू असल्याने गेटवे, मरिन ड्राइव्ह आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
गृह विभागाने सोमवारी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना पाठविल्या आहेत. त्यानुसार, ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्रकिनारा, बाग, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता फिजिकल डिस्टन्सिंगचे (सामाजिक अंतर) पालन करावे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सगळ्यांनी मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे या सूचनांमध्ये म्हटले आहे.
दरवर्षी विशेषत : मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी ३१ डिसेंबरच्या रात्री नागरिकांची मोठी गर्दी होत असते. मंदिरे तसेच सार्वजनिक ठिकाणी लोक एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडत असतात. काही ठिकाणी या निमित्ताने खास सेलिब्रेशनचे कार्यक्रम भरविले जातात.
यंदा कोरोना विषाणूूमुळे निर्माण झालेल्या संसर्गाचे संकट अद्याप दूर झालेले नाही. अशावेळी कोरोनाचा संसर्ग हाेणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, मिरवणुका काढू नयेत, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.