गृहमंत्र्यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड-१९मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी नाताळ साध्या पद्धतीने व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
ख्रिश्चन बांधवांनी नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये जास्तीतजास्त ५० लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चमध्ये त्या वेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर राखले जाईल, याची प्रामुख्याने काळजी घेणे तसेच चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
घरातील ६० वर्षांवरील नातेवाईक तसेच १० वर्षांखालील मुलांच्या सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टीने त्यांना घराबाहेर नेणे टाळावे, आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाइन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, ज्याचा लाभ घरी असणाऱ्या व्यक्तींनाही होईल. त्याचप्रमाण कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमांचे किंवा मिरवणुकांचे आयोजन करू नये. फटाक्यांची आतषबाजी करू नये. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
..........................