मुंबई: येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे भव्य राममंदिराचा उद्घाटन सोहळा होणार असून त्यादिवशी मुंबईत दिवाळी साजरी करा, यानिमित्त मुंबईतील मंदिरे व महत्वाच्या इमारतींना रोषणाई करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी महापालिका आयुक्तांना दिल्या.
मुंबईतील दहा ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्त्वात सुरू होत असलेल्या डीप क्लीन ड्राइव्ह उपक्रमात मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते, या कार्यक्रमात त्यांनी या सूचना दिल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत झाडे लावली पाहिजेत. ज्या ठिकाणी झाडे कापली जातात. त्याबदल्यात इतर ठिकाणी झाडे लावली जातील.
१,४८३ टन कचरा गोळा मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेने ३ डिसेंबरपासून ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ सुरू केली. अभियानातून आतापर्यंत १३०० टन राडारोडा (डेब्रीज) आणि १८३ टन कचरा गोळा करण्यात आला तर, सुमारे २२ हजार२७७ किलोमीटर इतक्या अंतराचे रस्ते धुऊन काढण्यात आले. संपूर्ण स्वच्छतेसाठी तब्बल ५२४५ इतके मनुष्यबळ एकाचवेळी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा गोळा करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी तब्बल ५०८ वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणांचीही मदत या कामी महापालिकेने घेतली आहे.
१० ठिकाणी अभियान सुरू -- भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया- वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय, भायखळा पूर्व- सदाकांत धवन मैदान, भोईवाडा पोलिस स्थानकासमोर, नायगाव पूर्व- वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम- वेसावे (वर्सोवा) चौपाटी- गणेश घाट, बांगूर नगर लिंक रोड, गोरेगाव पूर्व- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रीडांगण, शिवसृष्टी, नेहरू नगर, कुर्ला पूर्व- अमरनाथ पाटील उद्यान, गोवंडी पूर्व- डी मार्ट जंक्शन, हिरानंदानी संकूल, पवई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व)