‘डॉ. आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:27 AM2021-04-07T03:27:17+5:302021-04-07T03:27:42+5:30
चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण करणार
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिलला उत्साहात आणि प्रथा, परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरी करा; पण सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घराघरांतूनच महामानवास अभिवादन करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.
जयंती समारंभाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खा. राहुल शेवाळे, जयंती समन्वय समितीचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, महेंद्र साळवे, नागसेन कांबळे, भदन्त बोधी आदी उपस्थित होते. जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारक स्थळावरून थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. भीमसैनिक आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करणारे आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशा परिस्थितीतही डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिलस्थित स्मारकाचे काम थांबू दिलेले नाही. तेथील पुतळ्यांची उंची आणि अन्य गोष्टींना गती दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.