‘पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा’
By Admin | Published: October 28, 2016 04:16 AM2016-10-28T04:16:38+5:302016-10-28T04:16:38+5:30
दिवाळीतल्या आतषबाजीमुळे प्रदूषणात वाढ होत असून, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. काही वर्षांपासून या समस्येत भरच पडत असल्याने, यंदा दिवाळी पर्यावरणपूरक साजरी
मुंबई : दिवाळीतल्या आतषबाजीमुळे प्रदूषणात वाढ होत असून, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. काही वर्षांपासून या समस्येत भरच पडत असल्याने, यंदा दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
फटाक्यांमध्ये अनेक घातक व प्रदूषणकारी घटक असतात, ज्यामुळे जमीन, हवा, पाणी यांचे प्रदूषण होते. फटाक्यांचा सर्वात घातक परिणाम हा लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर होतो. काही देशांमध्ये फटाक्यांवर संपूर्णत: किंवा आंशिक बंदी आहे. काही देशांमध्ये विशिष्ट प्रकारच्या (उदा. रॉकेट) फटाक्यांवर पूर्ण बंदी आहे. भारतामध्ये १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे. शाळा, महाविद्यालये, न्यायालये, धार्मिक स्थळे, रुग्णालये यांचा परिसर हा ‘शांतता क्षेत्र’ म्हणून गणला जातो. शांतता क्षेत्रापासून १०० मीटर परिसरात आवाज करणारे फटाके फोडण्यावर बंदी आहे. रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके फोडण्यावर बंदी आहे. (प्रतिनिधी)
- शक्यतो फटाके फोडणे टाळावे.
- आवाज न करणारे फटाके फोडावेत.
- फटाके फोडताना शेजारी पाण्याने भरलेली बादली ठेवावी किंवा लगेच पाण्याचा पुरवठा होऊ शकेल अशा नळाला जोडलेला पाईप ठेवावा.
- काही अपघात झाल्यास तातडीने प्रथमोपचार स्वरुपात पाण्याचा वापर करता येऊ शकेल.
- फटाके खिशात ठेवू नयेत.
- फटाके काचेच्या किंवा धातूच्या भांड्यात ठेवून फोडू नयेत.
- फोडून झाल्यावर फटाक्यांच्या अवशेषांवर पाणी टाकावे.
- आपण फटाके फोडणार आहोत तो परिसर ‘शांतता क्षेत्र’ किंवा फटाके फोडण्यासाठी बंदी असलेले क्षेत्र नाही याची खातरजमा करून घ्यावी.
- लहान मुले फटाके फोडणार असल्यास पालकांनी किंवा मोठ्यांनी त्यांच्या सोबत राहावे.