Join us

पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 5:43 PM

मांगल्याचे प्रतीक म्हणून काही ठिकाणी तुळशीची पूजा तर काही ठिकाणी वडाच्या झाडाच्या चित्राची

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत यंदाची वटपौर्णिमा घरातच साजरी करण्यास महिलांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले.  अनेकींचा वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून किंवा तुळशीला प्रतिक मानून आणि छोटी वादाची फांदी त्यात रोवून वटपौर्णिमा साजरी करण्याकडे कल दिसून आला. पर्यावरणी दिनी आलेली ही वटपौर्णिमा म्हणूनच याचे विशेष महत्त्व ठरले. काही ठिकाणी मंदिरात किंवा मोकळ्या जागेत असलेल्या वडाला सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत वटपौर्णिमा साजरी केल्याचे चित्र ही तुरळक दिसून आले.लॉकडाउनमध्ये वटपौर्णिमा आल्याने पूजा कशी करायची, पूजेचे साहित्य मिळणार का, अशा अनेक शंका महिलांच्या मनात निर्माण झाल्या होत्या. पण त्यावर अनेकींनी मार्ग शोधला आणि घरच्या घरी अगदी फांदीही न आणता वटपौर्णिमा साजरी  केली. वडाची फांदी तोडण्याऐवजी  वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून त्याची पूजा केल्याचे काही महिलांनी सांगितले, तर काहींनी तुळशीची मनोभावे पूजा केल्याचे सांगितले. काही ठिकाणी महिलांनी बाहेर जाऊन वादाची पूजा केली मात्र तेथे ही त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले असल्याची माहिती त्यांनी दिली. काही सोसायट्यांमध्ये आणि चाळींमध्ये प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आल्याने एकाच कुंडीत वडाची फांदी लावून सोय करण्यात आली.आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत पूजा करण्यात आल्याची माहिती गोराईमधील एका सोसायटीच्या सचिवांनी दिली.शहराच्या आरोग्यासाठी वडाचे झाड बहुगुणी आहे. शहरात धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे, परंतु हे धुलिकण शोषून हवा शुद्धीकरणासाठी या झाडांचा मोठा हातभार लागतो. झाडाच्या पानांमागे बघितले तर मोठ्या प्रमाणात धुलिकण चिकटून बसलेले असल्याचे दिसून येते. आरोग्याच्या दृष्टीने ही झाड बहुमोल असून त्याची पाने, फळे, फांद्या, पारंब्यांचा आयुर्वेदात मोठा उपयोग आहे.  कापून त्यांच्या फांद्याची पूजा करणे अयोग्य असल्याचे मत चारकोपच्या मनीषा शिंदे यांनी व्यक्त केले. यंदाची वटपौर्णिमा घरात देवाला नैवेद्य दाखवूनच साजरी केल्याचे त्यांनी सांगितले.पर्यावरण दिनी जर आपण झाडाची फांदी तोंडात असू आणि दोन महिन्यांहून  चाललेल्या लॉकडाऊन नियमांचे पालन करणार नसू आपल्या शिक्षित असण्याला काय अर्थ आहे. निसर्गाची पूजा हीच देवाची पूजा आहे कारण हेच पर्यावरण आपल्या पुढील पिढीच्या आरोग्यसाठी फलदायी ठरणार आहे. त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा पर्यावरणपूरक साजरी केली  असल्याची माहिती कांदिवली सहयाद्री नगर येथील सुवर्णा कळंबे यांनी दिली.

टॅग्स :पर्यावरणमहाराष्ट्रमुंबई