रामनवमी घरातल्या घरातच साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:06 AM2021-04-22T04:06:45+5:302021-04-22T04:06:45+5:30
राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क रामनवमी अर्थात प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिन बुधवारी साजरा झाला खरा; मात्र यंदा श्रीरामांंचा पाळणा ...
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
रामनवमी अर्थात प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिन बुधवारी साजरा झाला खरा; मात्र यंदा श्रीरामांंचा पाळणा सोहळा केवळ घरातल्या घरातच करण्याची वेळ समस्त रामभक्तांवर आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागलेल्या निर्बंधांच्या आनुषंगाने सर्वच मंदिरे बंद होती; परिणामी भक्तजनांची रामनवमी घरीच साजरी झाली.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही या काळात लॉकडाऊन असल्याने, गेल्यावर्षीचीच पुनरावृत्ती यंदा झाली.
गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी लॉकडाऊन लागला आणि त्यावेळीही रामनवमी अशीच पार पडली होती. संपूर्ण वर्ष उलटले आणि यंदाची रामनवमी आली, तरी कोरोनाने काढता पाय काही घेतलेला नाही. उलट त्याचा प्रादुर्भाव नव्याने वाढू लागला लागला आहे. साहजिकच, सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. या पार्श्वभूमीवर, मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांचा पाळणा केवळ घरातच हलवण्याच्या मर्यादा भक्तजनांंवर येऊन पडल्या.
दरम्यान, फुलबाजार थंडावल्याने पूजेसाठी लागणारी फुले बाजारातून गायब झाल्याचे चित्र होते. श्रीरामांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला वाहण्यासाठी भक्तांना फुलेही उपलब्ध झाली नाहीत. त्यावर उपाय म्हणून काहीजणांनी कागदी फुले बनवून श्रीरामांच्या चरणांवर वाहून समाधान मानले. ज्यांनी दोन दिवसांपूर्वी फुलांची बेगमी करून ठेवली होती, त्यांना मात्र फुले उपलब्ध होऊ शकली. मात्र भाविकांनी घरच्या घरी गोड जिन्नस बनवून प्रभू श्रीरामचंद्रांना नैवेद्य अर्पण केला. अनेकांनी केवळ मानसपूजेच्या माध्यमातून श्रीरामांचे ध्यान करत, कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळू दे; असे साकडे प्रभू श्रीरामचंद्रांना घातले.
चौकट:-
सप्ताहावरही विरजण...
सध्या मंदिरे बंद असल्याने श्रीरामांचे दर्शन तर भक्तांना घेता आले नाहीच; परंतु गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चालणाऱ्या सप्ताहावरही विरजण पडले. सप्ताहाच्या या काळात मंदिरांत भजन, कीर्तन व पारायणे होत असतात. भक्तजनांसाठी हा सप्ताह म्हणजे अपूर्व काळ असतो. मात्र भक्तजनांना या सगळ्यावर पाणी सोडावे लागले.
.......................................