शिवजयंती तिथीनुसार साजरी करा - शिवसेना
By admin | Published: February 20, 2015 01:13 AM2015-02-20T01:13:50+5:302015-02-20T01:13:50+5:30
महाराष्ट्रात पुढील वर्षापासून शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीनुसार साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पुढील वर्षापासून शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीनुसार साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तारखेनुसार १९ फेब्रुवारीला साजरी करण्यात येणाऱ्या शासकीय शिवजयंतीमध्ये यंदा शिवसेनेचे मंत्री सहभागी झाले होते.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी केली पाहिजे ही शिवसेनेची मागणी असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती मान्य करावी. यंदा निष्कारण वाद नको म्हणून शिवसेनेचे मंत्री कार्यक्रमात सहभागी झाले, असेही देसाई यांनी सांगितले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, उद्योगमंत्री देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, महापौर स्नेहल आंबेकर यांनी दादर शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. (विशेष प्रतिनिधी)
सत्ताधाऱ्यांना वेळ नाही
लोणी (जि. अहमदनगर) : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता मिळविलेल्या भाजपा सरकारला शिवस्मारक भूमिपूजनासाठी वेळ नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
शासनाने शिवजयंतीच्या दिनी अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्याची केलेली घोषणा हवेत विरली, हे दुर्दैव आहे. या स्मारकाची अपेक्षा राज्यालाच नव्हे, तर देशालाही आहे. कामाची सुरुवात करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ नसल्याचे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर आयोजित शिवजयंती सोहळ्यात विखे यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.