'तिथीचा हट्ट सोडा, १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा'; राष्ट्रवादी नेत्याचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 01:22 PM2020-02-04T13:22:29+5:302020-02-04T13:23:37+5:30
शिवजयंतीच्या तारखेवरुन वाद हा नवा नाही. दरवर्षी शिवसेनेकडून १९ फेब्रुवारीऐवजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते.
मुंबई - येत्या १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरी केली जाते. शासकीय तारखेनुसार १९ फेब्रुवारी शिवजयंती साजरी केली जाते. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचीशिवसेना तिथीनुसार साजरी करत आली आहे.
मात्र मुख्यमंत्र्यांनी तिथीचा हट्ट सोडा व १९ फेब्रुवारीला शिवजयंती तारीख जाहीर करा असं आवाहन राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.
मला पटतय, आपल्याला पटतय ना..?@uddhavthackeray@CMOMaharashtrapic.twitter.com/2icwBL6EtS
— Amol mitkari (@amolmitkari22) February 2, 2020
शिवजयंतीच्या तारखेवरुन वाद हा नवा नाही. दरवर्षी शिवसेनेकडून १९ फेब्रुवारीऐवजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. मागील सरकारमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी केली होती. इतकचं नाही तर शिवसेनेचे माजी खासदार यांनी चंद्रकांत खैरै यांनी सांगितले होते की, शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते. त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंती मराठी तिथीप्रमाणेच साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
शिवजयंतीच्या या तारखेवरुन शिवसेना आणि अन्य मराठा संघटनांमध्ये औरंगाबाद येथे मारहाणीचा प्रकारही घडला होता. शिवजयंती १९ फेब्रुवारीला तारखेनुसार साजरी केली जात असताना शिवसेना नेत्यांकडून तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती साजरी करण्याचा घाट घातला जातो. हा शिवरायांचा अवमान आहे त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचं बंद करावं अशी मागणी आमदार नितेश राणेंनी केली होती.
तर शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी याबाबत शिवसेना-मनसेचं एकमत आहे. शिवाजी महाराजांची जयंती केवळ उत्सव नव्हे तर आपला सण आहे. आपण दिवाळी, गणपती आणि अन्य कोणताही सण तारखेनुसार साजरे करत नाही. मग शिवाजी महाराज है दैवत आहेत. त्यांची जयंती तिथीनुसार व्हावी अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली होती. त्यामुळे शिवसेना आता राज्यातील सत्तेत आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात. राष्ट्रवादीच्या आवाहनाला शिवसेना काय प्रतिसाद देते हे पाहणं गरजेचे आहे.