'शिवजयंती साध्या पद्धतीनं साजरी करा, केवळ 10 व्यक्तींची उपस्थिती असावी'
By महेश गलांडे | Published: February 11, 2021 05:02 PM2021-02-11T17:02:51+5:302021-02-11T17:04:21+5:30
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे.
मुंबई - कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात एकही सण किंवा उत्सव थाटामाटात, धुमधडाक्यात साजरा करता आला नाही. गेल्या वर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती. त्यानंतरचा, एकही सण साजरा झाला नाही. कारण, मार्च महिन्यात कोरोनाच सावट देशावर घोंगायला लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्या दिवस देश ठप्प झाला होता. त्यानंतरही कित्येक महिने देशात लॉकडाऊन राहिला. आता, लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी कोरोनाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या गृह विभागाने परिपत्रक जारी करुन शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होत आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आणि नियमावली बंधनकारक असल्याने सार्वजनिक सण-उत्सव आयोजनाची परवानगी प्रशासनाने नाकारली. यासंदर्भात गृह मंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे.
मुंबई - शिवजयंती साजरी करण्यासाठी सरकारची सूचनावली pic.twitter.com/44mWUdswLk
— Lokmat (@MiLOKMAT) February 11, 2021
1. यंदा गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी
2. मिरवणूक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये
3. केवळ 10 व्यक्तींच्या उपस्थितीच शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणूक काढू नये.
4. आरोग्यविषय उपक्रमे आणि शिबीर यांची जनजागृती करावी
5. सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियम पाळण्याकडे अधिकचे लक्ष द्यावे
6. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
मिरवणुकीला परवानगी नाही
शिवजयंतीनिमित्त राज्यभरात गावापासून ते मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते. परंतु, सार्वजनिक ठिकाणी व लोकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, असे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याखान, किर्तन, मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली असून केवळ ऑनलाईन पद्धतीने हे कार्यक्रम घ्यावेत, असेही गृह खात्याने सूचवले आहेत.