मुंबई : मुंबई महापालिकेसह मुंबईकरांनी केलेल्या सहकार्यामुळे मुंबईत बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचा दावा केला जात आहे. मात्र गणेशोत्सवामधील अनुभव लक्षात घेता तसेच पाशिचमात्य देशांतील दुसरी लाट पाहता दिवाळीत मुंबईकरांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी घराबाहेर न पडता घरातच दिवाळी साजरी करावी. दिवाळी पहाटसारखे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. गर्दी होईल असे कार्यक्रम टाळावे. शक्यतो ऑनलाइन कार्यक्रमांवर भर द्यावा. एकंदर कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने मुंबईकरांना केले.
फटाक्यांमध्ये मानवी आरोग्यासाठी अत्यंत विषारी घटक आहेत. त्यामुळे पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी केले. दिवाळीत फटाके फोडू नका. त्याचा धूर मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करा, असे आवाहन पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या मिली शेट्टी यांनी केले.
मास्क न लावण्याकडे वाढला कल
मुंबईत काेराेना बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याने आता अनेक मुंबईकर घराबाहेर पडताना मास्क लावणे टाळत आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धाेका आहे. त्यामुळे अशांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. मास्क वापरण्याबाबत मोहीम तीव्र करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.