Join us

मुंबईसह राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, डोंबिवली, गिरगावात शोभायात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 9:00 AM

राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात, डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात येत आहे

मुंबई : राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या गिरगावात, डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रा काढण्यात येत आहे. चित्ररथ, मर्दानी खेळ, बाईक रॅली आणि लोककलेची पर्वणी अशा कार्यक्रमांमुळे शोभायात्रेत अनेक रंग भरले आहेत. 

ढोल-ताशा, लेझीमच्या तालावर तरुणाई हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेसाठी तयार झाली आहेत. गुढी उभारुन ठिकठिकाणी रांगोळी काढून यात्रेचं स्वागत केलं जातंय. चिमुरड्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण उत्साहात शोभायात्रेत सहभागी झाले आहे. गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. यंदाच्या शोभायात्रेत अनेक महिला बुलेटस्वारी करताना पाहायला मिळत आहे. त्याचसोबत शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेकांनी देशभक्तीचे संदेश घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. पारंपारिक पोशाखात महिला, तरुणमंडळी या मेळाव्यात सहभागी झालेत.

सकाळपासूनच गिरगाव, डोंबिवली, नाशिक, ठाणे याठिकाणी हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेत नववारी साडी नेसून मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला आहे. लहान मुलं, महिला, अबाल वृद्ध सगळेच जण उत्स्फुर्तपणे शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. चौकाचौकात ढोलताशे, लेझीमच्या तालावर तरुणाई थिरकताना पाहायला मिळत आहे. डोंबिवलीमध्ये शोभायात्रेचं विशेष महत्त्व आहे. डोंबिवलीच्या भागशाळा मैदानापासून शोभायात्रा सुरू झाली आहे. फडके रोडवर मोठ्या प्रमाणात नागरिक शोभायात्रेत सहभागी होत आहेत. चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं काम केलं जातंय. यंदाच्या शोभायात्रेत निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळत आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी जनजागृती करण्याचे संदेशही झळकताना पाहायला मिळत आहे.

प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी काढलेल्या शोभायात्रेत मराठी माध्यमांच्या या मुलांनी धम्माल करत या मराठीमोळ्या सणाचे महत्व जपण्याचा प्रयत्न केला. दादर, गिरगाव, ठाणे अशा विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत. या शोभा यात्रांमधून परंपरा आणि आधुनिकतेचे सुरेख मिश्रण पाहायला मिळत आहे.

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा होतो. यानिमित्ताने मराठी नववर्षाचे स्वागत ठिकठिकाणी स्वागतयात्रांच्या माध्यमातून केले जाते. पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करून देणारे खेळ आणि प्रात्यक्षिके या शोभायात्रांमधून दाखवले जातात. मुंबई आणि उपनगरांमध्ये अशाप्रकारे शोभायात्रेचं आयोजन केले आहे.

टॅग्स :गुढीपाडवाहिंदू