मुंबई : शहर-उपनगरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध चौकांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणूक, प्रभातफेरी, मोटारसायकल रॅली आदी उपक्रमांनी शिवजयंती साजरी झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, महापौर स्नेहल आंबेकर, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.विधानभवनातही छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, आ. सुनील तटकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तुतारी, सनई, चौघड्यांच्या आवाजाने परिसर दुमदमून गेला. आम आदमी पक्षाच्या महाराष्ट्र विभागातर्फेही शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ‘योग्य प्रशासन म्हणजे काय याचा आदर्श शिवाजी महाराजांनी आपल्याला घालून दिलेला आहे. सर्वधर्मसमभाव हाही त्यांच्या शासनाचा मुख्य गाभा होता. आजच्या काळात राजकारण करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी हा आदर्श आपल्यासमोर ठेवायला हवा,’ अशी भावना आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे संयोजक सुभाष वारे यांनी व्यक्त केली आहे.शिवजयंती उत्सवाचे वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर परिसरामध्ये आयोजन केले होते. नगरसेवक विलास भोईर आणि मंदा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी सेक्टर २६ येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. वाशी विभागातील ८० महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. महिलांसाठी सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर ब्रह्मकुमारी शीलादेवी यांचे प्रवचनही आयोजित करण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर सागर नाईक व आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते पुष्पमाला वाहिली. नवी मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर कोपरखैरणे, बोनकोडे सेक्टर १२ मध्ये शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)च्छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल, खारघर, कामोठे व ग्रामीण भागात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पनवेलमध्ये नगर परिषदेतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. खारघर तसेच पनवेलमधील ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . च्पनवेल शहरामध्ये शिवाजी चौकात महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर निघालेल्या भव्य मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांसह नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे व नगरसेवक सहभागी झाले होते. नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार शिवजयंती प्रदूषणमुक्त साजरी करण्यात आली.