नवी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

By Admin | Published: February 20, 2015 12:09 AM2015-02-20T00:09:19+5:302015-02-20T00:09:19+5:30

लेझीम... ढोल-ताशांच्या गजरात आणि हर.. हर.. महादेव... जय शिवराय...च्या जयघोषात नवी मुंबईत ठिकठिकाणी पारंपरिक मिरवणूक काढून शिवरायांचे स्मरण करण्यात आले.

Celebrating Shiv Jayanti in Navi Mumbai | नवी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

नवी मुंबईमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

googlenewsNext

नवी मुंबई : लेझीम... ढोल-ताशांच्या गजरात आणि हर.. हर.. महादेव... जय शिवराय...च्या जयघोषात नवी मुंबईत ठिकठिकाणी पारंपरिक मिरवणूक काढून शिवरायांचे स्मरण करण्यात आले. शिवप्रतिमेला पुष्पहार वाहून शासकीय, खाजगी कार्यालयात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचे वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, जुईनगर, नेरूळ आणि बेलापूर परिसरामध्ये आयोजन केले होते. नगरसेवक विलास भोईर आणि मंदा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी सेक्टर २६ येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया मोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. वाशी विभागातील ८० महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. महिलांसाठी सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, आदेश बांदेकर, नगरसेवक विजय भोईर, मंदा भोईर, महिलावर्ग उपस्थित होता.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर सागर नाईक व आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते पुष्पमाला वाहिली. नवी मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता सुनील लाड, शिक्षणाधिकारी दत्तात्रय नागरे आदी मान्यवर उपस्थित होते. कोपरखैरणे, बोनकोडे सेक्टर १२ मध्ये शिवसेनेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
शिवजंयतीचे औचित्य साधून शिवस्मृती मित्र मंडळाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आयकर कॉलनी सेक्टर २१ व २२ मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महिला आणि मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या वेळी नवी मुंबई उपशहर प्रमुख रोहिदास पाटील, विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील आणि शिवस्मृती मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
राजमुद्रा प्रतिष्ठानने जुईनगर येथे शिव पालखीची भव्य मिरवणूक काढली. त्यात शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते. सकाळी प्रतापगडावरून निघालेल्या शिवज्योतीचे भव्य स्वागत केले. त्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सायंकाळी पाच वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)

च्छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल, खारघर, कामोठे व ग्रामीण भागात उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पनवेलमध्ये नगर परिषदेतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. खारघर, तसेच पनवेलमधील ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
च्पनवेल शहरामध्ये शिवाजी चौकात महाराजांच्या अश्वारुढ पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर निघालेल्या भव्य मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांसह नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे व नगरसेवक सहभागी झाले होते. नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार शिवजयंती प्रदूषणमुक्त साजरी करण्यात आली. दरम्यान या वेळी चित्रकला, पोवाडा, लेझीम आदी स्पर्धादेखील आयोजित केल्या होत्या.

महाड : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी, रायगडवाडी, टकमकवाडीतील तरुणांच्या रायगड युवक विकास संघ या संघटनेने प्रतापगड ते किल्ले रायगड शिवज्योतीचे आयोजन केले होते. सकाळी ६ वाजता निघालेली ज्योत गुरुवारी महाड शहरामध्ये आल्यानंतर महाडकर नागरिकांच्या वतीने या शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शिवप्रभूंचा सहवास ज्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पूर्वजांना मिळाला ते सर्व भाग्यवान आहेत. रायगडच्या पायथ्याशी असलेली बहुतांशी घरे धनगर समाजाची असून, शिवकाळापासून या समाजाचे वास्तव्य किल्ले रायगडाच्या सान्निध्यात आहे.
तिसऱ्या वर्षी प्रतापगड ते किल्ले रायगड शिवज्योत काढण्यात येत आहे. सुमारे ६० - ७० शिवभक्त तरुण सुमारे ४० किमीच्या शिवज्योत दौडमध्ये सहभागी होत असून, सर्व जण किल्ले रायगड परिसरात राहणारे आहेत.

 

Web Title: Celebrating Shiv Jayanti in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.