मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पर्वणी, ३८ देशांतील १०१८ चित्रपट पाहण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 11:22 AM2024-06-09T11:22:10+5:302024-06-09T11:23:00+5:30
Mumbai International Film Festival News: अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते २१ जून दरम्यान मुंबईमध्ये होणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रसारण सचिव संजय जाजू यांनी सांगितले. महोत्सवाचे ठिकाण मुंबईतील एफडी-एनएफडीसी कॉम्प्लेक्स आहे.
मुंबई - अठरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते २१ जून दरम्यान मुंबईमध्ये होणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रसारण सचिव संजय जाजू यांनी सांगितले. महोत्सवाचे ठिकाण मुंबईतील एफडी-एनएफडीसी कॉम्प्लेक्स आहे. तर, मिफचे स्क्रिनिंग दिल्लीत सिरीफोर्ट ऑडिटोरियम, चेन्नईमध्ये टागोर फिल्म सेंटर, पुणे येथे एनएफएआय ऑडिटोरियम आणि कोलकात्यामध्ये एसआरएफटीआय ऑडिटोरियममध्ये होणार आहे.
मुंबई आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करताना जाजू यांच्यासह अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, पीआयबीच्या प्रधान महासंचालक शेफाली शरण आणि एफएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार उपस्थित होते. १५ जून रोजी मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे आणि चेन्नई येथे ‘बिली अँड मॉली, ॲन अदर लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन, तर २१ जून रोजी सुवर्ण शंख विजेत्या चित्रपटाने सांगता होईल.
स्पर्धा विभागासाठी ३८ देशांमधून ६५ भाषांतील १०१८ चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या आहेत. २५ आंतरराष्ट्रीय आणि ७७ राष्ट्रीय स्पर्धा विभागांसाठी चित्रपट तज्ज्ञांच्या तीन निवड समित्यांनी ११८ चित्रपटांची निवड केली आहे. या वर्षी उच्च दर्जाचे चित्रपट आले असल्याने निवड करणे कठीण झाल्याचे निवड समितीने सांगितले. यंदा मिफ प्रोग्रामिंगमध्ये ३१४ चित्रपट दाखवले आहेत. आठ जागतिक प्रीमियर, सहा आंतरराष्ट्रीय प्रीमियर, १७ आशिया प्रीमियर, १५ भारत प्रीमियर होणार आहेत.
चार देशांमधून विशेष पॅकेज
यंदाच्या महोत्सवासाठी विशेष पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत. यात ऑस्कर आणि बर्लिनेल पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या पॅकेज प्रत्येकी १२ लघुपट दाखवले जातील.
रशिया, जपान, बेलारूस, इटली, इराण, व्हिएतनाम आणि माली या सात देशांच्या सहकार्याने ‘स्पेशल कंट्री फोकस पॅकेज’ केले आहे. फ्रान्स, स्लोव्हेनिया, अर्जेंटिना आणि ग्रीस या चार देशांमधून ॲनिमेशन पॅकेज तयार केले आहे.
देशभरातील नामांकित संस्थांमधील ४५ विद्यार्थी चित्रपट दाखवले जातील. नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडियाकडून क्लासिक्स पॅकेज पुनर्संचयित केले आहे. देशाची प्रगती, विकास आणि समृद्धी दर्शवणारे अमृतकालमधील भारताच्या विशेष थीमवर स्पर्धात्मक चित्रपटही आहेत.