लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महानगरपालिकेद्वारा जारी केलेल्या नियमांनुसार दहिसर पश्चिम आय.सी. कॉलनी, ग्रीन पार्क येथे कृत्रिम तलावात जय श्रीकृष्ण सेवा समितीद्वारे मोठ्या उत्साहात छठपूजा करण्यात आली. मावळत्या आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देत भाविकांनी शांततेत छठपूजा केली.
शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माजी नगरसेवक मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोविड १९च्या सर्व नियमांचे पालन करून यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळत हा सण साजरा करण्यात आला. या ठिकाणी कृत्रिम तलाव बनविण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्यामुळे मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत हा सण शांततेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी नागरिकांचे कौतुक केले. तर जय श्रीकृष्ण सेवा समितीने या नीटनेटक्या आयोजनाबद्दल आयोजकांचे तसेच पोलीस-पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, सहायक पोलीस आयुक्त सुनील वडके, शाखाप्रमुख राजू इंदुलकर, महिला संघटक जुडीथ मेंडोसा, लालाचंद पालसहित पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------------------