Join us

विद्यापीठाच्या मराठी विभागात सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘साहित्य संवाद’ कार्यक्रमांतर्गत कादंबरी मुक्त चर्चा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या ‘साहित्य संवाद’ कार्यक्रमांतर्गत कादंबरी मुक्त चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर यांच्या हस्ते झाले.

प्रसिद्ध मराठी कादंबरीकार डॉ.रंगनाथ पठारे, अधिष्ठाता डॉ.राजेश खरात, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.धनाजी गुरव उपस्थित होते. या सत्राच्या बीजभाषणात डॉ.रंगनाथ पठारे यांनी मराठी कादंबरीच्या दिशा स्पष्ट करून कादंबरी निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखविली. वेगवेगळ्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ कादंबरीकाराच्या निर्मितीवर काय परिणाम करीत असतात, या विषयीचे विवेचन केले, तर कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांच्या सद्यस्थितीविषयी मांडणी करून मराठी विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागाने वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सर्वांना सहभागी करून घ्यावे, भाषा आणि साहित्याच्या संशोधनाविषयीचे कार्य विभागाने पुढे न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

उद्घाटन सत्रानंतर ‘मी आणि माझे कादंबरी लेखन’ या पहिल्या परिसंवादाचे नजुबाई गावित यांचे अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. डॉ.आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी कादंबरीची समीक्षा तोकडी आहे का? या विषयाच्या अनुषंगाने दुसऱ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादानंतर ‘सांस्कृतिक बदल आणि मराठी कांदबरीतील स्थित्यंतर’ या विषयावर प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे यांचे अध्यक्षतेखाली तिसऱ्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.नागनाथ कोतापल्ले यांनी मराठी कांदबरीच्या सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा आढावा घेऊन सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने मराठी कांदबरीत झालेले बदल स्पष्ट केले.