Join us

शहरात जोरदार ‘सेलीब्रेशन’ मूड!

By admin | Published: December 25, 2016 4:22 AM

ख्रिश्चन बांधवांचा सर्वांत मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. शहर-उपनगरातील वांद्रे, कुलाबा, माहीम, माझगाव, गिरगाव

मुंबई : ख्रिश्चन बांधवांचा सर्वांत मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. शहर-उपनगरातील वांद्रे, कुलाबा, माहीम, माझगाव, गिरगाव येथील चर्चना विद्युत रोशणाई करण्यात आली असून, सकाळी सामूहिक प्रार्थना तर संध्याकाळी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल आॅल द वे’च्या सुरामध्ये शहरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधव सकाळी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. या वेळी धर्मगुरूंनी दिलेला प्रभू येशूचा संदेश, विशेष भक्ती, प्रवचन, तरुणांचे गायन आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत, त्यानंतर सर्वत्र केक आणि ख्रिसमस ट्रीसह ठिकठिकाणी सांताक्लॉज अवतरतात. ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात. नाताळचा उत्साह सर्वधर्मीयांमध्ये पाहायला मिळतो. चर्चची सौंदर्यपूर्ण वास्तू, चर्चबाहेर असलेल्या चांदण्या, मेणबत्त्या, येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा आदी तयारी पूर्ण झाली आहे. शहर-उपनगरातील चर्च, कार्यालये, घरामध्ये रंगीबेरंगी विद्युत रोशणाई, ख्रिसमस ट्री तसेच येशूच्या जन्मस्थळाच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरही ख्रिसमसची धूमसर्व सणांप्रमाणेच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टिष्ट्वटरवरही ख्रिसमसची धूम दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच ख्रिसमसच्या शुभेच्छांचा पाऊस व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झाला असून, ख्रिसमस सेलीब्रेशनचे कार्यालय, कॉलेज येथील फोटोंचेही शेअरिंग सोशल मीडियावर सुरू आहे. खासकरून सांताक्लॉजच्या टोप्या घालून काढलेले फोटो डीपीवर ठेवण्यावर तरुणाई पसंती दर्शवित आहे. (प्रतिनिधी)गेल्या काही वर्षांपासून ख्रिसमस म्हटल्यावर सेलीब्रेशनमध्ये रमणारी तरुणाई त्यापलीकडे जाऊन समाजातील वंचित घटकांसाठी ‘सांताक्लॉज’ झाली आहे. तरुणाईने महाविद्यालय, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सच्या मदतीने आदिवासी मुले, खेड्यापाड्यातील मुले आणि रस्त्यावरील लहानग्यांसाठी सांताक्लॉज बनण्याचे ठरविले आहे.