मुंबई - इंडियन हेरिटेज सोसायटीच्या आणि राज्याच्या पर्यटन विभागाच्या सहकार्याने १३ आणि १४ जानेवारी रोजी मुंबई संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे ३२ वे वर्ष आहे. यंदा या महोत्सवाची खासियत म्हणजे, प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी हा महोत्सव एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर रंगणार आहे. हा दोन दिवसीय महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असल्याने नववर्षाच्या सुरुवातीला कला रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात १३ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या 'कॉन्फ्लुएन्स - म्युझिक फॉर पीस अँड हार्मनी ' अर्थात 'संगम - शांती आणि सुसंवादासाठी संगीत ' या कार्यक्रमाने होणार आहे. तर दुसर्या दिवशी १४ जानेवारी रोजी विदुषी अश्विनी भिडे देशपांडे आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचा 'भक्ती संगम ' हा कार्यक्रम सादर होईल.
मुंबई संस्कृती महोत्सवाला १९९२ मध्ये सुरुवात झाली .१९९१ या वर्षी इंडियन हेरिटेज सोसायटीच्या अध्यक्षा अनिता गरवारे यांनी आताचा ऐतिहासिक परिसर अर्थात बाणगंगा तलाव जतन करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. त्यातून १९९२ पासून बाणगंगा महोत्सवाला सुरुवात झाली होती, त्यानंतर या महोत्सवाचा विस्तार करीत मुंबई संस्कृती महोत्सवाचा पायंडा पडला. 'लाइव्ह म्युझिक टू सेव्ह अवर हेरिटेज' या मिशनचा भाग म्हणून यंदाचा मुंबई संस्कृती महोत्सव 'वैश्विक शांतता' या संकल्पनेला महत्व देत आहे . बासरी, तबला, मृदंगम, तालवाद्य, सतार, हार्मोनिअम, पखवाज गिटार आणि अशा अनेक विविध प्रकारच्या वाद्यांचा ताळमेळ सांस्कृतिक धागा जोडण्यासाठी सज्ज झाला आहे.
शहरातील वारसा म्हणून जतन करण्यात येणाऱ्या महत्वाच्या वास्तूंचे पुनरुज्जीवन करण्यात इंडियन हेरिटेज सोसायटी महत्त्वाची भूमिका बजावते. संगीताच्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाची आणि संस्कृतीची सातत्याने जाणीव करून देण्याच्या दृष्टिने हा महोत्सव आत्यंतिक महत्वाचा आहे, अशी माहिती अनिता गरवारे यांनी दिली आहे.