प्रदूषणविरहित साजरा करादिवाळीचा उत्सव!
By admin | Published: November 10, 2015 02:23 AM2015-11-10T02:23:24+5:302015-11-10T02:23:24+5:30
दीपोत्सवाच्या दिव्यांनी मुंबापुरीच्या अष्टदिशा उजळून निघाल्या आहेत. बाजारपेठेतल्या खरेदी-विक्रीने कोट्यवधीचे इमले पार केले आहेत.
सचिन लुंगसे, मुंबई
दीपोत्सवाच्या दिव्यांनी मुंबापुरीच्या अष्टदिशा उजळून निघाल्या आहेत. बाजारपेठेतल्या खरेदी-विक्रीने कोट्यवधीचे इमले पार केले आहेत. दीपोत्सवातल्या आतषबाजीला काहीसा अवकाश असला, तरी अभ्यंगस्नानाच्या शुभमुहूर्तावर नेत्रदीपक रोषणाईने मुंबईचा कानाकोपरा उजळून निघत आहे. अशाच काहीशा प्रकाशमय झालेल्या दिवाळीतील आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण होऊ नये, म्हणून विविध सेवाभावी संस्थांनी दीपोत्सव प्रदूषणविरहित साजरा करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आवाज फाउंडेशन आणि मुंबई पोलीस हे दिवाळीत ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून याबाबत पुरेपूर जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रदूषणाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. २०१४ साली गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत दिवाळीदरम्यान फटाक्यांचा आवाज तब्बल ४० डेसिबलने खाली आला होता. आवाज फाउंडेशनच्या नोंदीनुसार, फटाक्यांचा आवाज १२५ हून ८५ डेसिबल एवढा खाली आला. म्हणजे गतवर्षी मुंबईकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली. त्यामुळे यंदाही समाजभान राखत मुंबईकरांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ‘आवाज फाउंडेशन’ने केले आहे.
पक्षी आणि प्राणिमित्रांसाठी काम करणाऱ्या भांडुप येथील ‘पॉज’ संघटनेनेही आतषबाजीने पक्षी आणि प्राण्यांना दुखापत होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीतील वायुप्रदूषणाने विशेषत: पक्ष्यांना त्रास होतो. परिणामी वायुप्रदूषण करतील, असे फटाके वाजवू नयेत, असेही संस्थेने म्हटले आहे. शिवाय फटाक्यांमुळे भटकी कुत्री अथवा मांजरांनाही दुखापत होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दिवाळीच्या रंगामुळे पक्षी आणि प्राण्यांचा बेरंग होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.
पर्यावरणासाठी काम करणाऱ्या काळाचौकी येथील ‘ह्युमॅनिटी फाउंडेशन’नेही दिवाळीत मुंबईकरांनी ध्वनी आणि वायुप्रदूषण करू नये, असे आवाहन केले आहे. विशेषत: मरिन ड्राइव्हवर आतषबाजीवेळी मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. त्यामुळे येथे आतषबाजी करणाऱ्यांनी पर्यावरणाचे भान ठेवावे, असे संस्थेने म्हटले आहे.
एकंदर दिवाळीतल्या रंगाचा बेरंग होऊ नये आणि दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा, यासाठी स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती सुरू केली आहे. संस्थांच्या आवाहनाला मुंबईकरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला तर दिव्यांच्या मंद प्रकाशाने मुंबापुरीचा दीपोत्सव झगमगून निघेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीदरम्यान आग लागण्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्य आणि वित्तहानी होते. विशेषत: चुकीच्या पद्धतीने वायरिंग केल्याने अथवा मीटर बॉक्सवर लोड पडून आग लागण्याच्या घटना घडतात. यावर खबरदारीचा उपाय म्हणून दिवाळीदरम्यान रोषणाई करा, पण जरा जपून, असे आवाहन वीज कंपन्यांनी मुंबईकरांना केले आहे.
मुंबापुरीत झुंबड!
मुंबई : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोमवारी दीपदान आणि धन्वंतरी पूजन करून मुंबईकरांनी दिवाळीची धडाक्यात सुरुवात केली. दरम्यान, धन्वंतरी पूजनाच्या मुहूर्तावर विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती.
फुललेल्या बाजारपेठांमधील गर्दीला आवरण्यासाठी मुख्य बाजारपेठांत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दक्षिण मुंबईतील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या मोहम्मद अली मार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीला मुंबई पोलीस उतरले होते. डबल पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसी खाक्या दाखवत मुंबई पोलीस वाहतुकीचा मार्ग सुकर करत होते.
दादरच्या फुल मार्केटमध्येही चांगलीच गर्दी उसळली होती. नरक चतुर्दशीच्या तयारीसाठी फुलांची खरेदी करण्यास गृहिणींनी गर्दी केल्याचे दिसले. सोबतच दादर, सीएसटी चर्चगेटदरम्यानचे फॅशन स्ट्रीट, वांद्रे येथील लिंक रोडवर कपडे खरेदी करण्यास मुंबईकरांनी पसंती दर्शवली. शिवाय गृहोपयोगी वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जितकी गर्दी होती, त्याहून अधिक गर्दी फेरीवाल्यांकडे दिसली.