Join us

साधेपणाने उत्सव साजरा होणार; दहीहंडी समन्वय समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 4:56 AM

वंचित घटकांना मदत करा विविध उपक्रम राबवा असे आवाहन समितीने केले.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी समन्वय समितीची बैठक मुंबईत पार पडली. बैठकीत राज्यातील दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र उत्सव साधेपणाने साजरा करुन समाजोपयोगी उपक्रम राबवावेत असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.वरील निर्णय फक्त या वर्षीसाठी असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दहीहंडी समन्वय समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी सांगितले की, यंदा दहीहंडी कोरोना संकटात सापडली आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळून दहीहंडी साजरे करणे शक्य नाही. पण गोविंदा पथकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा करा. वंचित घटकांना मदत करा विविध उपक्रम राबवा असे आवाहन समितीने केले.गुरुपौर्णिमेला रक्तदान शिबिरदरवर्षी गुरुपौर्णिमेला दहीहंडी पथकांच्या सरावाला सुरुवात होते. यंदा माझगाव ताडवाडी येथील श्री दत्त क्रीडा मंडळाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कर्करोग रुग्णांसाठी महादान रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे तसेच अन्य समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतील, असे पथकाचे प्रशिक्षक व दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर म्हणाले.