घराचा आनंदोत्सव साजरा, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ८९१ सदनिकांची सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:32 AM2017-11-11T06:32:46+5:302017-11-11T06:32:54+5:30

वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ८१९ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली.

Celebrations of the house, dock of 891 tanks from MHADA Bombay Board | घराचा आनंदोत्सव साजरा, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ८९१ सदनिकांची सोडत

घराचा आनंदोत्सव साजरा, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ८९१ सदनिकांची सोडत

Next

मुंबई : वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ८१९ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. ८१९ सदनिकांच्या सोडतीसाठी ६५,१२६ अर्जदार पात्र ठरले होते. सकाळी साडेदहाला सुरू झालेल्या सोडतीचा कार्यक्रम दुपारी एक वाजेपर्यंत रंगला होता.
सभागृहाखालील मोकळ्या जागेत अर्जदारांना निकाल पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात येत होते. संकेतस्थळावर ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा उपलब्ध होती. सोडतीचे फेसबुक लाइव्ह प्रक्षेपण अर्जदारांना घरबसल्या बघायला मिळत होते. सोडतीचा निकाल सायंकाळी सहा वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.
म्हाडाचे घर लागावे, अशी आशा मनाशी ठेवत मुंबईच्या विविध कोपºयांतून आलेल्या अर्जदारांनी रंगशारदा सभागृह गच्च भरले होते. सभागृहात सर्वांच्या चेहºयावर उत्कंठा पाहायला मिळाली. ज्यांना सोडतीमध्ये घर लागले; त्यांनी एकच जल्लोष केला. काहींची नावे प्रतीक्षा यादीवर होती, अशा अर्जदारांच्या चेहºयावर चिंता आणि ज्यांना घर लागले नाही, अशांच्या चेहºयावर निराशा पाहायला मिळाली. सकाळी पावणेअकराच्या सुमारास तुताºयांच्या निनादात सोडत जाहीर होण्यास सुरुवात झाली; पाहता पाहता हा घरांचा सोहळा रंगतदार झाला.
घरांच्या सोडतीचा कार्यक्रम सुरू असतानाच उपस्थितांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मात्र सोडतीसाठी घरांची संख्या खूपच कमी असल्याने नेहमीच्या सोडतींपेक्षा या वेळी गर्दी कमी असल्याचे जाणवले. यात नाव जाहीर झालेल्या अर्जदारांचे थेट मंचावरील नेतेमंडळी आणि म्हाडाच्या अधिकाºयांच्या हस्ते अभिनंदन केले जात होते.

एक हजार घरे कोणासाठी?
मे महिन्यातील एक हजार घरांच्या लॉटरीमधील साठ टक्के घरे ही अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी असतील, अशी माहिती मुंबई मंडळाकडून देण्यात आली.
सदनिकांच्या वितरणासाठी एजंट नेमलेला नाही
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अशा कोणत्याही व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास मुंबई मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

२ कोटींचे घर नेहा अगरवाल यांना लागले
यंदा म्हाडाच्या सोडतीमधील ८१९ घरांपैकी सर्वाधिक चर्चा झाली ती लोअर परळ येथील १ कोटी ९५ लाख रुपयांच्या घरांची. स्वस्तात घरे देणाºया म्हाडाच्या घराची एवढी किंमत पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. हे बहुचर्चित घर नेहा अगरवाल यांना लागले. तर प्रणव तहिलीआनी यांचे नाव या घरासाठीच्या प्रतीक्षा यादीत असून, म्हाडाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या निकालातून ही माहिती समोर आली आहे.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतीक्षानगर-सायन, मानखुर्द, चांदिवली, मागाठाणे-बोरीवली या ठिकाणच्या एकूण आठ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली.
अल्प उत्पन्न गटाकरिता कन्नमवारनगर विक्रोळी, चारकोप कांदिवली (पश्चिम), सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), चांदिवली, मानखुर्द, मालवणी मालाड येथील १९२ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली.
मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रतीक्षानगर-सायन, सिद्धार्थनगर-गोरेगाव (पश्चिम), उन्नतनगर-गोरेगाव (पश्चिम), चारकोप कांदिवली (पश्चिम), गायकवाडनगर-मालवणी मालाडमधील एकूण २८१ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली.
उच्च उत्पन्न गटाकरिता लोअर परेल-मुंबई, तुंगा-पवई, चारकोप कांदिवली (पश्चिम), शिंपोली -कांदिवली (पश्चिम) येथील एकूण ३३८ सदनिकांची सोडत काढण्यात आली.

‘लकी’ खुर्ची
म्हाडाची सोडत नेहमी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात जाहीर केली जाते. म्हाडाच्या घरांसाठी काही लोक सातत्याने अनेक वर्षे अर्ज भरतात. मात्र त्यांच्या पदरी नेहमी निराशाच येते. असे लोक म्हाडाच्या घरांसाठीच्या मागच्या वेळी झालेल्या सोडतीमध्ये ज्या व्यक्तीला घर लागले, ती व्यक्ती ज्या खुर्चीवर बसली होती त्याच खुर्चीवर बसण्यासाठी धडपडत करत असतात आणि सोडत संपेपर्यंत त्या खुर्चीवरून हलत नाहीत. अशा ‘लकी’ खुर्चीची गोष्ट रंगशारदा सभागृहात पाहायला मिळाली.

लाइव्ह सोडत
सोडतीमध्ये घर लागलेल्या लोकांपैकी खूपच कमी लोक या वेळी उपस्थित होते. म्हाडाने सोडतीचे फेसबुक आणि संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण केले. सुमारे ३० हजारांहून अधिक लोक ही सोडत लाइव्ह पाहत होते. मुंबई महाराष्टÑासह अनेक देशांमधील लोकांचा त्यात समावेश होता.

मुंबईत घर मिळाले
विक्रोळी येथील कन्नमवारनगरमध्ये घर मिळाले आहे. कलाकार कोट्यातून मला घर मिळाल्यामुळे या क्षेत्रात इतकी वर्षे जे काम केले आहे; त्याचे फळ मिळाल्यासारखे वाटत आहे. मुंबईत हक्काचे घर मिळावे, अशी सर्वांची इच्छा असते. सध्या मी माझ्या आईकडे राहते. म्हाडामुळे मला मुंबईत घर मिळत आहे, याचा आनंद आहे.
- दीपाली सय्यद, नृत्य दिग्दर्शिका
स्वप्न पूर्ण झाले
विक्रोळी येथील कन्नमवारनगरमध्ये घर मिळाले. खारघर येथे मुलासोबत राहते. अनेक वेळा म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता. परंतु लॉटरीत घर कधीच लागले नाही. यंदा म्हाडामुळे मुंबईत हक्काचे घर मिळणार आहे. यामुळे घराची प्रतीक्षा संपली, असे वाटत आहे. स्वप्न पूर्ण झाल्याचा मोठा आनंद आहे. - सुगंधाबाई कुरुडे

आता नो वेटिंग...
गोरेगाव येथे घर लागले. २००९ सालापासून विविध गटांतून घरांसाठी अर्ज भरत आहे. तरीही घर काही लागत नव्हते. आजच्या दिवशीसुद्धा सकाळी सायन येथील प्रतीक्षानगरच्या घरांसाठीची सोडत जाहीर झाली; तेव्हा माझे नाव जाहीर झाले नाही. वाईट वाटले. परंतु अखेर गोरेगाव येथील घरांसाठीच्या यादीत माझे नाव जाहीर झाल्याने आनंद होत आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी आता नो वेटिंग अशी
भावना आहे. - मोहन कोळी

विश्वास बसत नाही
गोरेगाव येथे घर मिळाले आहे. आतापर्यंत पाच वेळा म्हाडाच्या घरासाठी अर्ज भरला होता. परंतु एकदाही घर मिळाले नाही. घर लागत नसल्याने निराश झालो होतो. मला स्वत:ला अर्ज भरता येत नाही. एका मित्राने माझ्यासाठी अर्ज भरला. त्याचा मी ऋणी आहे. लॉटरीत घर लागल्यामुळे जेव्हा माझे नाव मंचावरून पुकारण्यात आले तेव्हा क्षणभर कानावर विश्वासच बसत नव्हता. - सदाशिव पवार

गोरेगाव येथे घर मिळाले आहे. याआधी चार वेळा अर्ज भरला होता. म्हाडामध्ये साडेपाच वर्षांपासून काम करत आहे. त्यामुळे मी म्हाडा कर्मचारी प्रवर्गातून अर्ज भरण्यासाठी पात्र ठरलो. या वेळी यश मिळाले. म्हाडाच्या घरांसाठी कोणतेही शॉर्टकट्स नाहीत. त्यामुळे सर्वांनी अर्ज भरा. नशिबाने साथ दिली तर नक्की म्हाडाचे घर मिळेल.
- हेमंत पाटील

१५ वर्षांची प्रतीक्षा संपली
विक्रोळी येथील कन्नमवार-नगरमध्ये घर लागले आहे. मी म्हाडामध्ये वरिष्ठ लिपिक या पदावर काम पाहत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मी म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत आहे. दोन वेळा माझे नाव प्रतीक्षा यादीत आले, परंतु त्याचा काही फायदा नाही झाला. मी सामान्य आणि म्हाडा कर्मचारी अशा दोन्ही प्रवर्गांतून म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न केले आहेत. अखेर पंधरा वर्षांनंतर आता लॉटरीत घर लागल्यामुळे आनंद होत आहे. परंतु माझ्यासारखे म्हाडाचे कित्येक कर्मचारी दरवर्षी म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना लॉटरीत घर लागत नाही. म्हाडाच्या सर्व कर्मचाºयांना ते निवृत्त होण्यापूर्वी घर मिळावे, अशी अपेक्षा आहे.
- अनंत शिंदे

Web Title: Celebrations of the house, dock of 891 tanks from MHADA Bombay Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.