‘ग्लोबल सिटिझन महोत्सवा’ला सेलिब्रिटींची मांदियाळी
By admin | Published: November 18, 2016 06:43 AM2016-11-18T06:43:25+5:302016-11-18T07:08:09+5:30
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छतेचे प्रश्न ज्वलंत झाले आहेत.
मुंबई : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छतेचे प्रश्न ज्वलंत झाले आहेत. हे प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी ‘दी ग्लोबल एज्युकेशन अॅण्ड लीडरशिप फाऊंडेशन’ यांच्यातर्फे मुंबईत राबवण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल सिटिझन’ महोत्सवाला देशासह जगभरातील सेलिब्रिटींची मांदियाळी जमणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या महोत्सवाद्वारे गोळा होणारा पैसा या समस्यांचे निराकारण करण्यासाठी वापरला जाणार आहे.
बीकेसी येथे १९ नोव्हेंबर रोजी एमएमआरडीएच्या मैदानात रंगणाऱ्या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान, सचिन तेंडुलकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, बॉलिवूड, क्रीडा, उद्योग जगतातील अनेक दिग्ग्ज उपस्थित राहणार आहेत. केवळ दिग्ग्ज नव्हे तर गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी व सार्वजनिक स्वच्छता या मुद्यांना हात घालणारा प्रत्येक नागरिक महोत्सवाचा अविभाज्य भाग असेल. सहभागी होणाऱ्यांमध्ये अर्जुन कपूर, विवेक ओबेरॉय, ए.आर. रहेमान, अरिजित सिंग, अंशुमन खुराणा, दिया मिर्झा, फरहान अख्तर, करिना कपूर-खान, विद्या बालन, मलायका अरोरा-खान, मोनाली ठाकूर,
परिणिती चोप्रा, रणवीर सिंग, श्रद्धा कपूर, अमृता खानविलकर यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
७३ कोटी लोकांना लाभ
महोत्सवाच्या व्यासपीठावरून २७ अब्ज अमेरिकेन डॉलर रकमेची कटिबद्धता जाहीर करण्यात
आली आहे. याद्वारे होणाऱ्या कामातून जगभरातील ७३ कोटी लोकांना लाभ होईल.
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह महोत्सवाचा पार्टनर
‘दी ग्लोबल एज्युकेशन अॅण्ड लीडरशिप फाऊंडेशन’ यांच्यातर्फे
हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ या भारतीय शाखेतर्फे मुंबईतील कार्यक्रम होणार आहे. राज्य सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या सहकार्याबरोबरच अनेक संस्था यात सहभागी होणार आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह हा या महोत्सवाचा पार्टनर आहे.
६० हजार लोकांना नि:शुल्क तिकिटे
गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी दहा लाखांहून अधिक कृतीकल्पना मांडण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या ६० हजार लोकांना महोत्सवासाठी नि:शुल्क तिकिटे देण्यात आली आहेत.
न्यूयॉर्कनंतर मुंबईला मान
अमेरिकेतील न्यूयॉर्कनंतर महोत्सवाच्या आयोजनाचा मान मुंबईला मिळाला आहे. महोत्सवासाठी विदेशातून ८ हजार तर, देशातून २५ हजार लोक सहभागी होणार आहेत. यातून पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाची सुमारे १३० कोटी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.