Join us

सचिन तेंडुलकर यांचा आदर्श सेलिब्रिटींनी घ्यावा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 8:21 AM

अन्य खेळाडूंनी सचिन तेंडुलकर यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सोमवारी केले.

मुंबई : ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींमुळे तरुण पिढी बरबाद होत असताना भारतरत्न सचिन तेंडुलकर असे एकमेव सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या जाहिराती कधीही केलेल्या नाहीत. अन्य खेळाडूंनी सचिन तेंडुलकर यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सोमवारी केले.

सेलिब्रिटी विविध उत्पादनांची जाहिराती करतात. यात मद्य किंवा गुटखा उत्पादनाच्या जाहिरातीही अनेक सेलिब्रिटी करताना दिसतात, हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित झाला. ऑनलाइन रमीबाबत विरोधी पक्षातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. अशा पद्धतीच्या ऑनलाइन रमीवर बंदी आणू शकता का?  याचबरोबर गुटखा असेल किंवा अशा ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना प्रतिबंध करता येईल का, असा प्रश्न अभिजित वंजारी यांनी विचारला. 

यावर फडणवीस म्हणाले,  जगातील भारतरत्न सचिन तेंडुलकर ही एकमेव अशी सेलिब्रिटी आहे, ज्यांनी कधीच कोणत्याही व्यसनाधीन उत्पादनाची किंवा ऑनलाइन गेमिंगची जाहिरात केली नाही, ज्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होईल किंवा त्यांना आर्थिक नुकसान होईल. सचिन तेंडुलकरसारख्या महान व्यक्तींना याच कारणामुळे भारतरत्न दिले गेले आहे. सचिन तेंडुलकरचा आदर्श इतर सेलिब्रिटींनीदेखील घ्यावा. 

तर पोलिसांना बडतर्फ करणार!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, अवैध ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अवैध जुगार प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी केली असून, व्यावसायिकांकडून वसुली करण्यासाठी दलालांची नेमणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला. हिंगोलीतील अवैध दारू धंद्यांचा विषय प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा कोणत्याच प्रकारात पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध आढळले नसल्याचे स्पष्ट केले. अवैध धंदे आणि दारूसाठी एमपीडीएसारखे किंवा मोक्कासारखे कायदे लावू. या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा यात दोषी आढळणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीससचिन तेंडुलकर