मुंबई : ‘सुन भिडू, चलती लोकल में हीरोगिरी करना, रेल्वे ट्रॅक क्रॉस करना, ये सब परदे पर ठीक लगता है, असली जिंदगी में नही...’ अशा ठेवणीच्या शैलीत सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ यांनी रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांची कान उघडणी केली आहे. लाइफ लाइनवरील ‘अपघात’ रोखण्यासाठी प्रवाशांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सेलिब्रिटींच्या माध्यमाने विशेष उपक्रम पश्चिम रेल्वेने सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत हिंदी, मराठी चित्रपटतील अभिनेते-अभिनेत्री प्रवाशांमध्ये जनजागृती करणार आहेत.पश्चिम रेल्वेने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून नुकेतेच सेलिब्रिटींच्या मदतीने प्रवासी जागरूक अभियान सुरू केले आहे. यात सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ, जॉन अब्राहम आणि अन्य १२-१४ अभिनेत्यांचे व्हिडीओ पोस्ट करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत धावत्या लोकलमधून स्टंट करू नयेत, रेल्वे रूळ ओलांडू नयेत, यासाठी जॅकी श्रॉफ आणि जॉन अब्राहम यांचे व्हिडीओ टिष्ट्वट करण्यात आले आहेत. लवकरच अन्य सिनेअभिनेते आणि अभिनेत्रींचादेखील या उपक्रमांसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच त्यांचे जनजागृती करणारे व्हिडीओ टिष्ट्वट करण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ‘लोकमत’ला दिली.अंधेरीच्या फलाट क्रमांक ५ वरून अंधेरी ते चर्चगेट असा रेल्वे प्रवास मी करत होतो. त्या काळातील आठवणी आजदेखील ताज्या आहेत. रेल्वे अपघातमुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत जॉन अब्राहम यांनी व्हिडीओत व्यक्त केले. सेलिब्रेटींच्या व्हिडीओला आतापर्यंत हजारोंच्या संख्येने प्रतिसाद दिला आहे. यामुळे किमान यामुळे तरी रेल्वे अपघातांमध्ये घट होईल, अशी शक्यता पश्चिम रेल्वेने वर्तविली आहे.आता तुमची जबाबदारी...धावत्या लोकलमधून स्टंट करणे, रेल्वे रूळ ओलांडणे या गोष्टी केवळ चित्रपटात ठीक आहेत. रूळ ओलांडताना क्षणार्धात अपघात होतो. रूळ ओलांडण्याआधी आपल्या आई-बाबांचा विचार करावा, त्यांनी तुम्हाला सांभाळले, आता त्यांना सांभाळायची तुमची वेळ आहे. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडू नका.- जॅकी श्रॉफ, सिनेअभिनेता.सचिनही मैदानातरेल्वे रूळ ओलांडणे, महिला सुरक्षा विषयांवर पश्चिम रेल्वेने सुरू केलेल्या विशेष जागरूकता अभियानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही सहभागी होणार आहे. सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ नुकताच पश्चिम रेल्वेने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर टिष्ट्वट केला आहे. लवकरच स्थानकातील एलईडी आणि एलसीडी स्क्रीनवर सचिनचा व्हिडीओ झळकणार आहे. त्याचबरोबर स्थानकातील उद्घोषणा यंत्रणेतदेखील सचिनच्या आॅडिओचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
सेलिब्रिटी घालणार रेल्वे प्रवाशांना साद...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 4:39 AM