मनोज गडनीस
मुंबई - मुंबईहून भुवनेश्वरच्या विमानात जाण्याासाठी शनिवारी सकाळी अभिनेत्री राधिका आपटे निघाली खरी, पण विमान कंपनीच्या तांत्रिक चुकीमुळे तिच्यासह अनेक प्रवासी एरोब्रीजमध्ये कोंडले गेले. किमान दीड तास हे प्रवासी त्यामध्ये अडकले होते. त्या काळात त्यांना प्यायला पाणी नव्हते आणि बाथरूमचीही सोय नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या राधिका आपटे या घटनेचा व्हीडीओ चित्रीत करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यानंतर जाग आलेल्या इंडिगो कंपनीने अखेर झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
शनिवारी सकाळी इंडिगो कंपनीचे विमान सकाळी साडे आठ वाजता भुवनेश्वरसाठी जाण्यासाठी उभे होते. मात्र, सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटे झाली तरी विमानात एकाही प्रवाशाला सोडण्यात आले नाही. विमानाच्या काऊंटरवरील कर्मचारी काहीही समस्या नसल्याचे सांगत होते मात्र तरी देखील विमानात सोडत नव्हते. त्यानंतर १० वाजून ५० मिनिटांनी जेव्हा विमानाचे बोर्डिंग सुरू झाले आणि प्रवासी एरोब्रीजवरून विमानात प्रवेश करू लागले त्यानंतर अचानक विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एरोब्रीज बंद करून टाकला. त्यामुळे अनेक प्रवासी जवळपास सव्वा तास आतमध्येच अडकून पडले. मात्र, असे का झाले याचे कोणतेही स्पष्टीकरण कंपनीने दिले नाही.
दरम्यान, केवळ दिलगिरी व्यक्त करून कंपनीचे प्रवक्त मोकळे झाले. परंतु, या सव्वा तासाच्या कालावधीमध्ये एरोब्रीजमध्ये अडकलेल्या प्रवाशांचे विशेषतः ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचे खूप हाल झाल्याची माहिती राधिका आपटे हीने तिच्या सोशल मीडियावरील खात्यावरून दिली आहे.