मतदान केंद्रात मोबाइल बंदीच; मतदानाच्या दिवशी पालिकेचे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार - गगराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:07 PM2024-10-17T14:07:59+5:302024-10-17T14:09:22+5:30

मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावर शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात येतो.

Cell phones banned in polling stations; 40 thousand municipal employees will be working on polling day says Gagrani | मतदान केंद्रात मोबाइल बंदीच; मतदानाच्या दिवशी पालिकेचे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार - गगराणी

मतदान केंद्रात मोबाइल बंदीच; मतदानाच्या दिवशी पालिकेचे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार - गगराणी

मुंबई : मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत; मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक ठिकाणी मतदार मोबाइल घेऊन केंद्रात जाताना दिसले; तर काही ठिकाणी मोबाइल बंदीमुळे अनेकजण मतदान न करताच परत निघून गेले. लोकसभेला झालेला गोंधळ लक्षात घेता, मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात आयोगाच्या सूचनेनुसार मोबाइल बंदी कायम असल्याचे पालिका आयुक्त तथा मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे. 

मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावर शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात येतो. या कारणास्तव मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करत मोबाइल घरी ठेवून मतदानासाठी येण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

विधानसभा निवडणुकीची माहिती देण्यासाठी गगराणी यांनी पालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्यांनी तयारीची माहिती दिली. मुंबई शहर व उपनगरात १२०० पेक्षा अधिक मतदारसंख्या असलेली १२७६, तर १० हजारांपेक्षा अधिक मतदारसंख्या असलेली १३९  मतदान केंद्रे आहेत. पोलिस प्रशासनाच्या मदतीने संवेदनशील मतदान केंद्रांचे सर्वेक्षण सुरू असून, त्या संदर्भातील माहिती दिली जाईल, असे पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)  सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. एका मतदान केंद्राच्या ठिकाणी १०पेक्षा जास्त केंद्रे असल्यास ते जवळच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. 

मुंबई उपनगर
एकूण मतदान केंद्रे    ७,५७४  
सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील मतदान केंद्रे    ५५३
झोपडपट्टी परिसरात मतदान केंद्रे    २२९
मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्रे    १,३०२
पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे     १३९

मतदारांना सर्व सुविधा मिळणार
सध्या  पालिकेचे बीएलओ कामासाठी १२ ते १५ हजार कर्मचारी देण्यात आले असून मतदानादिवशी ४० ते ४२ हजार कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करतानाच, प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी आसनव्यवस्था, स्वच्छतागृहे, इत्यादी निश्चित किमान सुविधांची पूर्तता करण्यात येणार आहे. 
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर करावयाच्या कार्यवाहीबाबत स्वतंत्रपणे बैठका घेण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबईचे उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. 

मुंबई शहर
एकूण मतदान केंद्रे    २,५३७  
उत्तुंग इमारतींमधील मतदान केंद्रे     १५६
सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील मतदान केंद्रे    १००
झोपडपट्टी परिसरात मतदान केंद्रे    ३१३
मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्रे     ७५ 
पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रे    १७
 

Web Title: Cell phones banned in polling stations; 40 thousand municipal employees will be working on polling day says Gagrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.