लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर योग्यप्रकारे अंत्यसंस्कार व्हावेत, यादृष्टीने महापालिकेने स्मशानभूमी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्याचबरोबर दफनभूमीतील अंत्यसंस्काराबाबतदेखील पालिका सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन संवेदनशीलपणे करीत आहे.
कोविड- १९ साथरोगास प्रतिबंध करण्यासह कोविडची बाधा झालेल्या रुग्णांना वेळेत योग्य ते औषधोपचार मिळावेत, यासाठी मुंबईकरांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या सर्वस्तरीय उपाययोजनांची दखल सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्यासह देशभरातील विविध यंत्रणांनी व जगातील विविध संस्थांनी घेतली असून, कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार व्हावेत, यादृष्टीने स्वतंत्र संगणकीय प्रणाली कार्यान्वित आहे.
मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेद्वारे ४६ ठिकाणी पारंपरिक स्मशानभूमींसह विद्युत वा गॅस दाहिनी असणाऱ्या स्मशानभूमी आहेत. पारंपरिक पद्धतीने दहन संस्कार करण्यासाठी ४६ ठिकाणी २१९ चितास्थाने आहेत, तर ११ ठिकाणी विद्युत वा गॅस दाहिनी असून, तिथे १८ शवदाहिनी आहेत. यानुसार एकूण २३७ चितास्थाने असून, यांची एकत्रित कमाल क्षमता २४ तासात १ हजार ४५८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे.
स्मशानभूमी ठिकाणी येणाऱ्या मृत व्यक्तीच्या आप्तांची गरज लक्षात घेऊन बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, हातपाय धुण्यासाठी पाणी, शौचालय सेवा सुविधा आहेत. जळाऊ लाकडे उपलब्ध करून दिली जातात. स्मशानभूमी परिसरात देण्यात येणाऱ्या सेवासुविधा नियमितपणे मिळाव्यात, यासाठी सुयोग्य देखरेख - रखरखाव परिरक्षणदेखील सातत्याने केले जाते. विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर संयंत्र काही कालावधीसाठी बंद ठेवले जाते. एका विद्युत वा गॅस दाहिनींमध्ये २४ तासात साधारणपणे ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ शकतात. या प्रकारची १८ चितास्थाने महापालिका क्षेत्रात आहेत.
हे लक्षात घेतल्यास विद्युत वा गॅस दाहिनीमध्ये चोवीस तासात साधारणपणे १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. लाकूड वापरून अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिका क्षेत्रात २१९ चितास्थाने आहेत. या प्रत्येक चितास्थानाची कमाल क्षमता २४ तासात साधारणपणे ६ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे, तर २१९ चितास्थानांची एकत्रित क्षमता ही २४ तासात साधारणपणे १ हजार ३१४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे.