मुंबई : डायनिंग कारमधील खुर्च्यांवर बसून चहाचा आस्वाद घेत प्रवासाचा लुटता येणारा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील आनंद आता इतिहासजमा झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर १९३0 साली सुरू झालेल्या डेक्कन क्वीन या पहिल्या डिलक्स ट्रेनमधील डायनिंग कारला (उपाहारगृह) मध्य रेल्वेकडून बाद करण्यात आले आहे. आयुर्मान संपल्यानेच हे डायनिंग कार बाद करण्यात आले असून, आता त्याऐवजी साधा पेन्ट्री कार डबा जोडण्यात आला आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनमधून मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रवास होतो. या प्रवासात डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील मिळणाऱ्या ब्रेट बटर, पापलेट ब्रेड, चीज टोस्ट सॅण्डवीच, चिकन कटलेटसह अन्य पदार्थ तसेच चहा-कॉफीवर प्रवाशांकडून चांगलाच ताव मारला जात होता. या कारमधील लाकडी खुर्च्या, टेबल असा थाट असणाऱ्या डायनिंग कारमध्ये अनेक प्रवासी मुंबई-पुणे मार्गावरील निसर्ग न्याहळत पदार्थांची चव चाखत होते. मात्र आयुर्मान संपलेले डायनिंग कार दुरुस्ती करण्याऐवजी ते बादच करण्याचा निर्णय घेतला आणि हे डायनिंग कार अचानक दोन महिन्यांपूर्वी बादही केले. त्याऐवजी दुसऱ्या एका ट्रेनचा पेन्ट्री कार (खाद्यपदार्थ बनविण्याचा डबा) जोडण्यात आले असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)