मुंबई : वीररत्न बाजी प्रभू देशपांडे यांचे वंशज व दिवंगत स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र काशिनाथ देशपांडे यांना राज्य सरकारने दिलेल्या मौजे. शिरगाव, बदलापूर येथील दोन एकर जमिनीपैकी काही जमिनीचा स्थानिक लोकांनी तब्बल २५ वर्षे अंत्यविधीसाठी परस्पर वापर करणे आणि स्थानिक नगरपालिकेनेही कुंपण भिंत बांधून व पत्र्याची शेड बांधून त्या जमिनीस स्मशानभूमीचे स्वरूप देण्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गेल्या आठवड्यात विधान परिषदेत सरकारचे वाभाडे काढले.सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले की, देशपांडे यांच्या वारसांकडून तक्रार आल्यानंतर आता त्या जागेचा स्मशानभूमीसारखा होणारा वापर बंद करण्यात आला असून पर्यायी स्मशानभूमीची सोय करण्यास नगरपालिकेस सांगण्यात आले आहे. देशपांडे यांचे वारस मोबदला घेऊन जमीन देण्यास तयार असल्यास आहे तीच जमीन घेऊन अथवा अन्य जमीन आरक्षित व संपादित करून स्मशानासाठी वापरण्यासंबंधीचा ठराव पालिका सभेत करण्यात आला आहे, असेही खडसे यांनी सांगितले.या संबंधीचा मूळ तारांकित प्रश्न निरंजन डावखरे, जगन्नाथ शिंदे, किरण पावसकर आणि अब्दुल्लाखान दुर्राणी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विचारला होता. नंतर मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने झालेले उपप्रश्न आणि चर्चेत या सदस्यांखेरीज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही सहभागी होऊन झाल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच स्वातंत्र्यसैनिकाच्या जमिनीची स्मशानभूमी झाली असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशा भावना होत्या. उत्तरांनी सदस्यांचे समाधान झाले नाही. उप सभापतींनी सहमत होत महसूलमंत्र्यांना असे सांगितले की, या जागेचा स्मशानभूमी म्हणून होत असलेला वापर बंद करावा दुसऱ्या स्मशानभूमीची सोय करावी. (विशेष प्रतिनिधी)
स्वातंत्र्यसैनिकाच्या जमिनीवर स्मशानभूमी
By admin | Published: April 02, 2015 10:57 PM