सीबीआयमार्फत चौकशी करा आणि आयुक्तांची हकालपट्टी करा - संजय निरुपम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:58 AM2018-01-10T01:58:49+5:302018-01-10T02:26:44+5:30
मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. थेट पालिका आयुक्तांचेच कार्यालय अशा प्रकारांमध्ये गुंतले आहे. या भ्रष्ट कारभारामुळेच कमला मिलसारख्या जळीतकांडांच्या घटना घडत आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. थेट पालिका आयुक्तांचेच कार्यालय अशा प्रकारांमध्ये गुंतले आहे. या भ्रष्ट कारभारामुळेच कमला मिलसारख्या जळीतकांडांच्या घटना घडत आहेत. या सर्व भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी आणि पालिका आयुक्त अजय मेहता यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कमला मिलमधील मोजोस् आणि वन अबव्ह या पब्समध्ये झालेल्या अग्निकांडाला ११ दिवस उलटले आहेत. प्रशासनाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळेच फायर आॅडिट नसतानाही येथील पबना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे या जळीतकांडाला महापालिका आणि आयुक्त अजय मेहता जबाबदार आहेत. तरीही या प्रकरणी आयुक्तांकडूनच चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. आयुक्तांकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचा मोठेपणा आयुक्तांमध्ये नाही. त्यामुळे अजय मेहता यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निरुपम यांनी पत्राद्वारे केली आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन किंवा सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणीही त्यांनी केली.