महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र अन् महाराष्ट्र सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 02:50 PM2023-06-07T14:50:13+5:302023-06-07T14:50:48+5:30
"ज्याठिकाणी मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे, चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य द्या"
"मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली.
"महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग सिस्टीम व मुलींची सुरक्षितता याला प्राधान्य दिलेच पाहिजे. आता तर सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात ज्या घटना घडत आहेत त्याबाबत केंद्र व राज्यसरकारचा दृष्टीकोन आहे त्यावरुन ते गंभीर दिसत नाहीत. हे दुर्दैवी आहे," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकारने पावले टाकावी
"ज्याने कृत्य केले त्याने आत्महत्या केली आहे त्यामुळे आता पहिल्यांदा वसतीगृहाची सुरक्षितता, त्यामध्ये हेल्पलाईन असतील, अलार्म बेल आणि कॅमेरे यांना प्राधान्य देत सरकारने लवकर पाऊले टाकली पाहिजे," अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
काय आहे प्रकरण?
चर्नीरोड येथील एका वसतिगृहाच्या खोलीत १८ वर्षीय तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी समोर आली. सुरक्षा रक्षकानेच तरुणीवर बलात्कार करत तिची गळा दाबून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. हत्येनंतर सुरक्षा रक्षकाने लोकल समोर येत आयुष्य संपविले आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया विरुद्ध हत्येसह बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.