Join us

आणखी किती ‘परीक्षा’? ५०० किमीवर केंद्र; शुल्कानंतर आता प्रवासाचाही भुर्दंड

By दीपक भातुसे | Published: August 14, 2023 9:14 AM

टीसीएस कंपनीच्या गोंधळामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्याला विदर्भात, तर विदर्भातील विद्यार्थ्याला पश्चिम महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले आहे.

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  तलाठी भरती परीक्षेसाठी जादा शुल्कानंतर आता विद्यार्थ्यांवर प्रवास भाडे आणि राहण्याच्या खर्चाचा बोजा पडणार आहे. आधीच बेरोजगारी त्यात हा वाढीव खर्च कसा भागवायचा,  असा प्रश्न अनेक गरीब विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. 

टीसीएस कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या तलाठी भरती परीक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांना तीन जिल्ह्यांचे पसंतीक्रम पर्याय द्यायचे होते. या तीनपैकी एकाच जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले जाणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते स्वत: राहत असलेला जिल्हा पहिला पसंतीक्रम तर आजूबाजूचे जिल्हे दुसरा आणि तिसरा पसंतीक्रम म्हणून निवडला होता. 

काही विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यासह ज्या जिल्ह्यात नातेवाईक आहेत ते जिल्हे परीक्षा केंद्रासाठी पर्याय म्हणून निवडले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी दिलेल्या तीन पर्यायांपैकी परीक्षा केंद्र न देता भलत्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र दिले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ४०० ते ५०० किलोमीटर प्रवास करून परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जावे लागणार आहे. यासाठी एक दिवस आधी त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन राहावे लागणार असल्याने तिथे राहण्याच्या खर्चाचा बोजा विद्यार्थ्यांवर पडणार आहे.

४,६४४ पदांसाठी भरती 

राज्य सरकारने दीर्घकाळानंतर ४ हजार ६४४  तलाठी पदांसाठी भरती जाहीर केली. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी  ९०० रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात आता दूरचे परीक्षा केंद्र आल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत भरच पडली आहे. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

मागितले जालना, दिले वर्धा 

एका विद्यार्थ्याने  जालना, पुणे आणि मुंबई असे तीन पर्याय दिले होते. त्याला वर्धा इथले परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. टीसीएस कंपनीच्या या गोंधळामुळे  मराठवाड्यातील विद्यार्थ्याला विदर्भात, तर विदर्भातील विद्यार्थ्याला पश्चिम महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळाले आहे.

 

टॅग्स :शिक्षणपरीक्षा