मुंबई : राज्य एका गंभीर संकटातून जात असताना आम्हाला या विषयावर राजकारण करायचे नाही, पण अशावेळी आम्ही राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हा विश्वास केंद्राकडून मिळायला हवा. तो मिळत नाही,अशी खंत महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, त्यासाठी त्यांनी अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला मागितल्याची माहिती समोर येत आहे, त्यावर ते म्हणाले, विधानपरिषदेच्या काही जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होणार होती. मात्र अचानक निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे निवडणूक आयोगाने त्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. ही अशी अपवादात्मक परिस्थिती पहिल्यांदा राज्यातच नाही तर देशात घडली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी केली आहे. मात्र राज्यपाल यात योग्य व राज्य हिताची भूमिका घेतील.केंद्र सरकारकडून जीएसटीचे १६ हजार कोटींपेक्षा जास्त पैसे येणे बाकी आहे, त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करत आहोत. आम्ही केंद्राकडे २५ हजार कोटींचे पॅकेज मागितले होते. ते अद्याप मिळालेले नाही. आम्ही केंद्राकडून नाही तर कोणाकडून अपेक्षा करायची?, असा सवाल त्यांनी केला.