मुंबईत सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:43+5:302021-09-03T04:06:43+5:30
मुंबई : समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी मुंबई येथील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयात सेंटर ...
मुंबई : समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी मुंबई येथील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
राज्यातील समाजकार्य महाविद्यालय ही संबंधित विद्यापीठाशी संलग्न आहे. सदर महाविद्यालयांना वेतन व वेतनेतर अनुदान व पद भरती मान्यता सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येते. राज्यातील बऱ्याच समाजकार्य महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करणे आवश्यक आहे. जेणेकरून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे उत्तम दर्जाचे असतील.
निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करून सेंटरमध्ये निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स व समाजकार्य अभ्यासक्रमात शिकविण्यात येणाऱ्या विषयातील तज्ज्ञ प्राधापक महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करतील. जेणेकरून मान्यवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावेल. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व देशात उत्तम दर्जाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सेंटरद्वारे महाराष्ट्रातील महाविद्यालयाचे प्राध्यापक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अद्ययावत राहतील, या उद्देशाने प्रशांत नारनवरे यांनी संकल्पना मांडली आहे.
डॉ. नारनवरे यांनी नुकतीच संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्मला निकेतन महाविद्यालयात भेट देऊन बैठक आयोजित केली होती. बैठकीत सेंटर सुरू करून कार्यवाही करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या. यावेळी वंदना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई व समाधान इंगळे, सहायक आयुक्त, मुंबई शहर तसेच निर्मला निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.