दहावीच्या परीक्षांसाठी महापलिकेच्या माध्यमिक शाळेत असणार केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:07+5:302021-04-02T04:07:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २९ एप्रिल ते २१ मेदरम्यान दहावी बोर्ड परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. राज्यात सद्यस्थितीमध्ये ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २९ एप्रिल ते २१ मेदरम्यान दहावी बोर्ड परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. राज्यात सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा देणारे विद्यार्थी व पर्यवेक्षीय यंत्रणा यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेच्या प्रत्येक माध्यमिक शाळेत परीक्षेचे केंद्र करण्याचे नियोजन केले आहे. पालिका शाळांमधील विद्यार्थी ज्या शाळेत दहावीचे शिक्षण घेत होते त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना पालिका शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. शिवाय, ज्या इमारतीमध्ये माध्यमिक शाळा कार्यरत आहेत त्या शाळा कोविड १९ केंद्रासाठी देण्यात येणार नाहीत, असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी बोर्ड परीक्षा इतर शिक्षकांच्या सुटीच्या कालावधीत होणार असून त्यामुळे मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी मध्यमिक शाळांच्या शिक्षकांव्यतिरिक्त प्रत्येक केंद्रावर प्राथमिक विभागातील पर्यवेक्षक म्हणून १० शिक्षकांची यादी शाळांनी करून ठेवावी व गरजेनुसार त्यांना परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून बोलावले जावे, अशा सूचना ही पालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांसोबत चतुर्थ श्रेणीतील २ कर्मचारी व इमारत हाऊस किपिंगसाठीचे कर्मचारी यांनी परीक्षा कालावधीत उपस्थित राहण्याची सोय शाळांनी करायची असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दहावी बोर्ड परीक्षेसाठी डेस्क, बेंचची कमतरता असल्यास आणि केंद्रप्रमुखाने मागणी केल्यास नजीकच्या शाळेतून त्याची पूर्तता करायची आहे. याव्यतिरिक्त सर्व परीक्षा केंद्रावर आवश्यक ट्यूब लाईट, पंखे, पिण्याचे स्वच्छ पाणी, केंद्रातील वर्गात सर्व सुविधांसोबत सॅनिटायजर, गन मशीन व इतर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची पूर्तता करणे आवश्यक असेल असेही शिक्षण विभागाकडून शाळांना स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट
पालिका शाळांतील इमारती आणि इतर आवश्यक सुविधा यासोबत शाळेच्या इमारतीची सॅनिटायझेशनची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेआधी शिक्षकांच्या लसीकरणाचे काय असा प्रश्न पालिका शाळांतील शिक्षक विचारत आहे. खासगी, अनुदानित, विनानुदानाची, पलिका माध्यमिक तसेच इतर व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांच्या लसीकरणाची सुविधा पूर्ण झाल्याशिवाय त्यांना दहावीच्या परीक्षांच्या कामात गुंतवणे म्हणजे त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचे शिक्षक संघटनाचे म्हणणे आहे.