लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे; तर औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला दिली. औरंगाबादच्या नामांतराबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटने गेल्या वर्षी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. १६ जुलै २०२२ रोजी तशी अधिसूचना काढण्यात आली आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. स्थानिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या का? केंद्र सरकारची मंजुरी नसतानी सरकारी कागदपत्रांवर बदललेल्या नावांचा उल्लेख का करण्यात येत आहे? यााबाबतीत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते.