Corona Vaccine: लस नसल्याने केंद्रे बंद; 1 मेपासून काय होणार?; नियोजनासाठी मुंबई महापालिका वेगाने करते आहे कार्यवाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 02:24 AM2021-04-28T02:24:41+5:302021-04-28T06:30:34+5:30
मुंबई : १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. सध्याच्या स्थितीत स्टॉक नसल्याने अनेक केंद्र बंद असताना ...
मुंबई : १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जाणार आहे. सध्याच्या स्थितीत स्टॉक नसल्याने अनेक केंद्र बंद असताना १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस कशी मिळणार हा प्रश्न महापालिकेने सोडविला आहे. या दिशेने कामदेखील सुरू झाले आहे. तर दुसरीकडे कोविड प्रतिबंधक लसीचा साठा मर्यादित स्वरूपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे. मुंबईत लसीकरणासाठी पात्र नागरिकांची संख्या सुमारे ४० लाख आहे. आतापर्यंत १० लाखापेक्षा अधिक मुंबईकरांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातही बीकेसी कोविड केंद्रातील लसीकरण केंद्र हे आजमितीस देशात सर्वाधिक लसीकरण करणारे केंद्र आहे. मुंबईतील सध्याची दैनंदिन कोविड लसीकरण क्षमता सुमारे ४५ हजार इतकी असून ती दररोज १ लाखांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकत्रित प्रयत्नातून लसीकरणाची संख्या वाढेल. लसीकरणाचा वेग वाढला तर संसर्ग निश्चितच आटोक्यात येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
१८ वर्षे - नागरिकांची संख्या सुमारे ९० लाख
कोविड प्रतिबंध लसीकरण मोहिमेत पुढचा टप्पा म्हणून १८ वर्ष व अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण १ मेपासून करण्यात येणार आहे. मुंबईत या वयोगटातील नागरिकांची संख्या सुमारे ९० लाख इतकी आहे. या पार्श्वभूमीवर, लसीकरणासाठी पुरेशी शीतसाखळी, जागा व मनुष्यबळ आदी निकषांची पूर्तता करीत असलेल्या खासगी वैद्यकीय केंद्रांनी लसीकरण केंद्र नोंदणीसाठी अर्ज करावेत.
मुंबईत १८ ते ४५ या वयोगटात ९० लाख नागरिक आहेत. सर्वांसाठी २ डोस याप्रमाणे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत. मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे हे कळीचे मुद्दे आहेत. महापालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. - इकबाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका
अडथळे आणि उपाय
१६ जानेवारी : पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे लसीकरण
१ फेब्रुवारी : पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण
१ मार्च : ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांचे लसीकरण
१० आणि ११ एप्रिल : ७१ खासगी रुग्णालयात लसीकरण थांबले
९ एप्रिल : ९९ हजार लसी उपलब्ध
१० एप्रिल : १ लाख ३४ हजार ९७० लसी उपलब्ध
१२ एप्रिल : ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात लसीकरण पुन्हा सुरू
१२ एप्रिल : ७१ पैकी ६२ खासगी लसीकरण केंद्र कार्यान्वित
२५ एप्रिल : १ लाख ५८ हजार मात्रा प्राप्त