कोरोनाला ठार मारून माणूस जगवणारी केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:48 AM2020-09-21T00:48:34+5:302020-09-21T00:49:35+5:30
महापालिकेचे कर्मचारी बनले योद्धा : ७,६५० बेड, १,४६६ वैद्यकीय कर्मचारी आणि ३५ तज्ज्ञ देताहेत लढा; मानसिक संतुलन बिघडू न देण्याचे आवाहन
- सचिन लुंगसे
मुंबई : खोकला येतो. श्वास कोंडतो. अस्वस्थ व्हायला होते. अचानक आरोग्य बिघडू लागते. आरोग्याची चाचणी केल्यानंतर कोविड पॉझिटिव्हचा अहवाल येतो आणि मग सुरू होते ती रुग्णाला आरोग्य यंत्रणा पुरविण्यासाठीची पळापळ. कधी रुग्णालय मिळत नाही. कधी रुग्णवाहिका मिळत नाही. कधी कोविड सेंटरमध्ये प्रवेश मिळत नाही. रुग्णावरील उपचारांसाठी डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांचा अभाव असतो. प्रशासन कोणालाच जुमानत नाही. हे सगळेच मिळाले तरी आसपासचे वातावरण बघूनच रुग्ण निम्मा होतो. त्यात पुन्हा आर्थिक, सामाजिक, मानसिक परिस्थितीतून कुटुंबालाही यातना होतात. मात्र या सगळ्यांवर मात करता यावी, रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढता यावे आणि मुंबापुरीला कोरोनामुक्त करता यावे म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. असंख्य अडथळ्यांना रुग्णांना तोंड द्यावे लागत असले तरीही कोरोना तुमच्यापर्यंत येणार नाही याची काळजी घेणारी मुंबई महापालिका रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी झटत असून, ७,६५० बेड, १,४६६ वैद्यकीय कर्मचारी आणि ३५ तज्ज्ञ यासाठी काम करत आहेत.
मुंबई : महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरू केली आहेत. यामध्ये भायखळा, एन.एस.सी.आय. वरळी, बीकेसी, नेस्को गोरेगाव, मुलुंड आणि दहिसरचा समावेश आहे. येथे सुमारे ७ हजार ६५० बेड उपलब्ध आहेत. १ हजार ४६६ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये केईएम, नायर, सायन या प्रमुख रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉयचा समावेश आहे. विशेष म्हणजे ११ खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत ३५ तज्ज्ञ डॉक्टर मंडळी दूरध्वनीद्वारे केंद्रांना सेवा देत आहेत. येथे गरजेनुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची तरतूद आहे.
या उपचार केंद्र्रांमध्ये आतापर्यंत २० हजार ७२२ रुग्णांवर उपचार झाले. मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, ‘चेस दि व्हायरस’ मोहिमेमुळे कोरोनाला रोखले गेले आहे. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली जात आहे. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घेतली जात आहे.
प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेवर भर देऊन रुग्णांची वाढती संख्या रोखत कोरोनावर नियंत्रण मिळवायला हवे. मास्क हा या पिढीसाठी आवश्यक बाब बनली आहे. लोकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे.
कोणत्या कोविड सेंटरमध्ये काय?
रिचर्डसन आणि क्रुडास या कंपनीच्या आवारात सेंटर
१ हजार बेड
१०० वैद्यकीय कर्मचारी
जसलोक रुग्णालयातील २ तज्ज्ञ
भाटिया रुग्णालयातील ३ तज्ज्ञ
आतापर्यंत १ हजार ५९८ रुग्णांवर उपचार
एन.एस.सी.आय.च्या आवारात सेंटर
५५१ बेड
१८७ वैद्यकीय कर्मचारी
बॉम्बे रुग्णालयातील ५ तज्ज्ञ
ब्रिच कँडी रुग्णालयातील ३ तज्ज्ञ
आतापर्यंत ३ हजार ५६१ रुग्णांवर उपचार
बीकेसी येथील
मैदानात सेंटर
१,८२४ बेड
५२२ वैद्यकीय कर्मचारी
लिलावती रुग्णालयातील ३ तज्ज्ञ
हिंदुजा रुग्णालयातील ४ तज्ज्ञ
आतापर्यंत ७ हजार ५८८ रुग्णांवर उपचार
नेस्को मैदानात सेंटर
२,१६० बेड
४९८ वैद्यकीय कर्मचारी
नानावटी रुग्णालयातील ४ तज्ज्ञ
कोकीलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयातील २ तज्ज्ञ
आतापर्यंत ४ हजार ९१७ रुग्णांवर उपचार
रिचर्डसन आणि क्रुडास या कंपनीच्या आवारात सेंटर
१,६५० बेड
२०५ वैद्यकीय कर्मचारी
फोर्टीस रुग्णालयातील
तज्ज्ञ डॉक्टर
आतापर्यंत १ हजार ६५२ रुग्णांवर उपचार
वैद्यकीय कर्मचारी,
तज्ज्ञ डॉक्टरांची फौज
६८५ बेड
२२४ वैद्यकीय कर्मचारी
बॉम्बे रुग्णालयातील ५ तज्ज्ञ डॉक्टर
सुराणा रुग्णालयातील ३ तज्ज्ञ डॉक्टर
आतापर्यंत १ हजार ४०६ उपचार