ऐन गर्दीच्या वेळी मध्य, हार्बर रेल्वेचा बोजवारा
By Admin | Published: August 9, 2016 04:21 AM2016-08-09T04:21:52+5:302016-08-09T04:21:52+5:30
ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वेचा बोजवारा उडाल्याच्या घटना सोमवारी घडल्या. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील विद्याविहार येथे सकाळच्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाला
मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वेचा बोजवारा उडाल्याच्या घटना सोमवारी घडल्या. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील विद्याविहार येथे सकाळच्या सुमारास सिग्नलमध्ये बिघाड झाला. तर संध्याकाळी हार्बरच्या गुरू तेज बहादूर नगर स्थानकाजवळ (जीटीबी) एका लोकलच्या टपावरील प्रवाशाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागला. यात त्याचा मृत्यू झाला. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे हार्बर एक तास विस्कळीत झाली होती.
मध्य रेल्वेवरील विद्याविहार स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत सकाळी १0.२५च्या सुमारास बिघाड झाला. या बिघाडामुळे मेन लाइनच्या धिम्या मार्गावरील लोकल तब्बल २0 मिनिटे उशिराने धावत होत्या. बिघाड दुरुस्त होण्यास सकाळचे ११ वाजले. त्यामुळे लोकल आणखीनच उशिराने धावू लागल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला. त्यानंतर संध्याकाळी ६.४0च्या सुमारास पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल जीटीबी स्थानकाकडे पोहोचत असतानाच टपावरील एक प्रवासी ओव्हरहेड वायरला चिकटला. या घटनेमुळे हार्बरवरील लोकल सेवेचा बोजवारा उडाला. चिकटलेल्या प्रवाशाला काढण्यासाठी ६.४९नंतर त्या ठिकाणचा ओव्हरहेड वायरचा विद्युतप्रवाह बंद करण्यात आला आणि प्रवाशाला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर रात्री ७.४५च्या सुमारास विद्युतप्रवाह सुरू करून लोकल सेवा पूर्ववत करण्यात आल्या. तब्बल एक तास हार्बरचा बोऱ्या वाजल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यात हार्बरच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मृत प्रवाशाचे नाव बदरू यादव (२८) असून, सायन कोळीवाडा झोपडपट्टीत राहणारा आहे. (प्रतिनिधी)